Sun, May 26, 2019 08:34होमपेज › Konkan › राजकारण्यांनी देशामध्ये स्वतःच्याच प्रगतीची काळजी घेतली!

राजकारण्यांनी देशामध्ये स्वतःच्याच प्रगतीची काळजी घेतली!

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 10:27PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

पाश्‍चात्य प्रगत राष्ट्रांनी विज्ञानाची कास धरल्याने त्यांनी आपल्या राष्ट्राची प्रगती साधली पण आपल्या  भारत देशातील राजकारण्यांनी स्वतःच्या प्रगतीशिवाय  देशाचा विचार केला नाही. परिणामी जगात ज्या-ज्यावेळी विविध क्षेत्राची गणना होती,त्यावेळी  भारत कायम शेवटीच राहिला,अशी खंत प्रमुख वक्त्यांनी व्यक्त करून राजकारण्यांच्या कार्यपध्दतीवरच निशाणा साधला.पालकांनी आपल्या मुलांना कुतूहलाने जगवावे तरच आपली मुले वैज्ञानिक दृष्टीने विचार करून प्रगती साधू शकतात,असा सल्लाही यावेळी दिला. 

कुडाळ वसुंधरा विज्ञान केंद्रात वसुंधरा सार्वजनिक  विश्‍वस्त न्यास आयोजित  मराठी विज्ञान  परिषदेचे 52 व्या अखिल  भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनास शनिवारी प्रारंभ झाला.अध्यक्ष उल्हास राणे,स्वागताध्यक्ष जेष्ठराज जोशी, संस्थापक सी.बी. नाईक, विशेष अतिथी डॉ. अनिल काकोडकर, प्रभाकर देवधर, अविनाश हावळ,आप्पा देशपांडे,सतिश नाईक,गजानन कांदळगांवकर आदी उपस्थित होते. 

उल्हास राणे म्हणाले,सिंधुदुर्ग ही मंथरलेली भूमी आहे.या ठिकाणी जागतिक पातळीवर नोंद घेणार्‍या अनेक गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे सारस पक्षाला दत्तक घेतलं जात त्याप्रमाणे डॉल्फिन दत्तक घेण्याची गरज आहे. अलिकडे  होत असलेला पर्यावरणाचा र्‍हास ही  चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.तर अनिल काकोडकर म्हणाले,मोठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामाजिक चळवळीची गरज असून लोकांना विज्ञानाकडे आकर्षित केले पाहिजे.शिक्षण आणि सामाजिक  विकास यांची सांगड घातली तरच सी.बी. नाईक यांच्यासारखी  व्यक्तिमत्त्वे तयार होतील. विज्ञानाच्या विस्तारासाठी संशोधन संस्थांनीही पुढे येणे काळाची गरज असल्याचे सांगून नेरूर वसुंधरा केंद्राच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी प्रभाकर देवधर यांनीही मनोगत व्यक्त केले.संस्थापक सी.बी. नाईक यांनी  प्रास्ताविकात नेरूर वसुंधराच रोपटं मी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून उभे केले असून आता ही संस्था अविनाश हावळ, गजानन कांदळगांवकर यांच्यासारखी प्रामाणिक मंडळी पुढे नेतील असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी सतिश नाईक यांनीही आपले विचार मांडले. 

यावेळी महाविद्यालय पातळीवर  कल्पना जोशी तर विद्यापीठ पातळीवर पराग गोगटे यांना प्रत्येकी 1 लाख रुपये व प्रमाणपत्र देवून ‘मनमोहन शर्मा विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कारा’ने सन्मानित केले.
तर मराठी  विज्ञान परिषद जळगांव विभागाला ‘उत्तम विभाग पुरस्कारा’ने रोख 21 हजार रूपये व प्रमाणपत्र देवून गौरविले. निसर्ग संवर्धन विषयक कामगिरीबद्दल भाऊ काटधरे तर वसुंधराचे चांगले काम केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सी.बी. नाईक व सौ. लता नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ‘वनस्पती शास्त्रज्ञांची ओळख’  हे पुस्तक व ‘लोकविज्ञान दिनदर्शिके’चे प्रकाशन करण्यात आले.महाराष्ट्रातून 72 विभागातील सदस्य उपस्थित होते.