Fri, Jul 19, 2019 20:00होमपेज › Konkan › गणेशोत्सवात १० डब्यांची  डबलडेकर धावणार

गणेशोत्सवात १० डब्यांची  डबलडेकर धावणार

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:34PMरत्नागिरी :  खास प्रतिनिधी

गणेशोत्सवात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या वातानुकूलित डबलडेकर एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे गणपतीसाठी गावी येणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

नियमित रेल्वे गाड्यांबरोबरच कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी मध्य तसेच पश्‍चिम रेल्वेच्या सहकार्याने जादा गाड्यांच्या शेकडो फेर्‍या आधीच जाहीर केल्या आहेत. मात्र, तरीही रेल्वेच्या  आरक्षण खिडक्यांवर चाकरमान्यांची गर्दी होत असल्याने आता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणार्‍या  (11085/11086) डबलडेकर एक्स्प्रेसला मुंबई-मडगावदरम्यान धावताना दि. 9, 12, 14, 16, 19 व 21 सप्टेंबर रोजी, तर मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावताना दि. 10, 13, 15, 17, 20 व 22 सप्टेंबर रोजीच्या फेर्‍यांसाठी दोन जादा डबे जोडण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे सध्या आठ डब्यांची धावणारी डबलडेकर गणेशोत्सव कालावधीत 10 डब्यांची धावणार आहे. दरम्यान, इतर दिवशी कोकण रेल्वे मार्गावर दिवसाआड धावणारी डबलडेकर लो. टिळक टर्मिनस ते रत्नागिरी मार्गावरही  दि. 4 ते 18 सप्टेंबर या कालावधीत विशेष गाडी म्हणून धावणार आहे. पहाटे 5.33 मुंबईतून सुटून रत्नागिरीत  दुपारी 2.30 वा. आलेली डबलडेकर त्याच दिवशी सायंकाळी 4.20 वाजता  मुंबईसाठी सुटणार आहे. ही गाडी रात्री 12.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे.