Wed, Nov 14, 2018 00:22होमपेज › Konkan › शिक्षकांच्या पगारासाठी आता कोकणात ‘ठाणे पॅटर्न’!

शिक्षकांच्या पगारासाठी आता कोकणात ‘ठाणे पॅटर्न’!

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 01 2018 11:20PMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील सुमारे 18 हजारांहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा 1 तारखेला पगार होतो. हा ठाणे पॅटर्न कोकणात राबविण्यात येईल, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आ. अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी दिली.

आ. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नातून ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे जुलै महिन्याचे पगार 1 तारखेलाच जमा झाले. त्यासाठी आ. डावखरे यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी), ठाणे जनता सहकारी बँक (टीजेएसबी) यांच्या वेतन पथक अधिकार्‍यांबरोबर समन्वय साधला होता. त्यानंतर त्यांच्याकडील तांत्रिक अडचणी समजावून घेत तोडगा काढला होता. या धर्तीवर कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा पॅटर्न राबविण्यात येईल, अशी माहिती आ.डावखरे यांनी दिली.

ठाणे पॅटर्ननुसार मुख्याध्यापकांनी वेतन पथकाकडे दरमहा 10 तारखेपर्यंत बिले सादर करावी. त्यानंतर वेतन पथकाकडून 25 तारखेपर्यंत बिलांना मंजुरी देऊन ती जिल्हा कोषागाराला सादर करण्यात येतात. त्याचवेळी बँकांच्या व्यवस्थापनाला पगारासाठी शाळांची यादीही दिली जाते. त्यानुसार बँकांकडून पगाराबाबतची औपचारिकता पूर्ण केली जाते. त्यामुळे 1 तारखेलाच शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होतो, अशी माहिती आ. डावखरे यांनी दिली. विशेषतः एखाद्या वेळी धनादेश न वटल्यास बँक व्यवस्थापनाकडून ओव्हरड्राफ्ट (ओडी) सुविधेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे पगारातील अडथळे दूर झाले आहेत.

ठाणे जिल्ह्याप्रमाणेच अन्य जिल्ह्यात बँक व वेतन पथकाच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्यात येईल. त्यानंतर त्या जिल्ह्यातील तांत्रिक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.