Fri, Apr 19, 2019 08:02होमपेज › Konkan › शेतकरी सन्मान योजना लाभासाठी ५ जूनपर्यंत मुदत

शेतकरी सन्मान योजना लाभासाठी ५ जूनपर्यंत मुदत

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:30PMओरोस : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत तांत्रिक कारणाने ऑनलाईन अर्ज केले नाही. अशा शेतकर्‍यांना 5 जून पर्यंत अर्ज करावेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महाराष्ट्र  शासनाकडून जाहीर करण्यात आली असून संदर्भिय शासन निर्णय व शुद्धीपत्रानुसार योजनेची अंमलबजावणी चालू आहे. या योजनेंतर्गत 24 जुलै 2017 ते 20 सप्टेंबर 2017  या कालावधीत शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाईन स्विकारण्यात आले होते. तथापी या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या विहित कालावधीत काही शेतकर्‍यांना काही वैयक्‍तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहित दिनांकापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, ही परिस्थिती विचारात घेवून ऑनलाईन अर्ज भरणेसाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली असून तसा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.

शेतकर्‍यांनी अर्जाच्या उपलब्ध नमुन्यामध्ये त्यांच्या संदर्भात लागू असलेली आपली माहिती भरून आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत सेवाकेंद्रावर संपर्क साधावा. सोबत आधार कार्ड, आधार नोंदणी क्रमांक(ईआयडी) केल्याबाबतची पोहोच, कर्जखाते पुस्तिका, उतारा व बचत पुस्तिका, पॅनकार्ड(असल्यास), पेन्शनची पीपीओ बुक, बँकेचे पासबुक यांची छायांकित प्रत, फोटो कॉपी, कर्जखात्याची माहिती असलेला तपशील असलेली कागदपत्रे इत्यादी सोबत घेवून जावीत.

शेतकर्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने नव्याने अर्ज सादर केल्यानंतर, आपल्या पूर्वीच्या अर्जात नवीन कर्जखात्यांच्या माहितीचा समावेश केल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत सेवा केंद्राद्वारे अर्जाची प्रत, पावती उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदार शेतकर्‍यांनी सदरची प्रत योजनेसंबंधी संदर्भ व माहितीसाठी जतन करून ठेवावी.शेतकर्‍यांनी नव्याने अर्ज केल्यानंतर अथवा वरीलप्रमाणे यापुर्वीच्या अर्जात कर्जखात्याची माहिती सामाविष्ट केल्यानंतर संबंधित अर्जदाराने दिलेल्या दुरध्वनी क्रमांकावर एस.एम.एस.द्वारे कळविणेत येईल.

शेतकर्‍यांनी नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे, पुर्वी दाखल केलेल्या अर्जामध्ये नवीन कर्ज खात्याची माहिती सामाविष्ट करणेबाबतची सुविधा पुर्वीप्रमाणेच निःशुल्क आहे. यासाठी शेतकर्‍यांना अर्ज सादर करताना आपले सरकार सेवाकेंद्राद्वारे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.