Wed, May 22, 2019 16:15होमपेज › Konkan › ‘टेक्नॉलॉजी’ शिक्षकांना पर्याय ठरत नाही

‘टेक्नॉलॉजी’ शिक्षकांना पर्याय ठरत नाही

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:39PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

आजच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. सर्वत्र डिजिटल शिक्षणाचे वारे वाहत आहे. मात्र, टेक्नॉलॉजी हा शिक्षकांसाठी पर्याय ठरत नाही. शिक्षक नसेल तर व्हिडीओ पाहून शिकता येत नाही. टेक्नॉलॉजीमुळे काम कमी झाले नसून, उलट वाढले असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल यांनी केले.

जिल्हा परिषद येथील श्यामराव पेजे सभागृहात शिक्षकदिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा स्वरूपा साळवी होत्या. यावेळी अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश बामणे, शिक्षण सभापती सहदेव बेटकर, बांधकाम सभापती विनोद झगडे, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी आदी उपस्थित होते. 

यावेळी गोयल म्हणाल्या की, शाळा हे मंदिर असून त्यातील शिक्षक हे देव आहेत. त्यामुळे शिक्षकांना समाजात मानाचे स्थान आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करताना आदर्श शिक्षक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना शिकवणे नव्हे तर स्वत:ही शिकत असणे, शिकण्याची जिद्द असणे, सर्व विद्यार्थ्यांकडे कोणताही भेदभाव न बाळगता समानतेने पाहणे हे गुण त्याच्यात असणे आवश्यक आहेत. शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास जागृत केला पाहिजे. समाजात पेशाने शिक्षक नसणारेही अनेकजण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुलांना शिक्षण देत आहेत. त्यांचाही शिक्षकदिनी गौरव झाला पाहिजे. ग्रामीण भागात शिकून मोठे झालेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच जिथे जास्त फी घेतली जाते तिथे चांगले शिक्षण मिळते, असेही नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांतही गुणात्मक शिक्षण मिळते.

यावेळी मंडणगडचे सुहास रांगले, दापोलीचे सुभाष काताळकर, खेडचे संतोष जाधव, चिपळूणचे संजय सोनवणे, गुहागरचे रवींद्र कुळये, संगमेश्‍वरचे प्रकाश गेल्ये, रत्नागिरीच्या मैथिली लांजेकर, लांजाच्या सुहास वाडेकर आणि राजापूरचे तानाजी मासये यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष गोवळे यांनी 2006 पासून प्रलंबित असलेली आदर्श शिक्षकांची वेतनवाढ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.