Sun, Aug 25, 2019 03:36होमपेज › Konkan › शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीत घोटाळा!

शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीत घोटाळा!

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 12 2018 10:24PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षक भरती घोटाळा केला आहे. यामध्ये एक  रॅकेट सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी केला आहे.याबाबत आपण पुणे येथील शिक्षण आयुक्‍त वीरेशकुमार साळोके यांच्याकडे तक्रार केली असून शासन निर्णयाप्रमाणे काम न करता इतर कामे करणार्‍या माध्यमिक शिक्षण विभागाच्या नावाने  चांगभलं  म्हणून 15 मे रोजी या कार्यालयासमोर शासन निर्णयांची होळी करणार असल्याचा इशाराही तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले, 4 सप्टेंबर 2013 च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांची पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती. सिंधुदुर्गसाठी 70 पदे मंजूर करून देण्यात आली होती. त्यांपैकी त्यावेळी 40 पदे भरण्यात आली व या पदांना सन 2014 मध्ये मान्यता देण्यात आली. तर इतर पदे आरटीई कायद्यानुसार रद्द झाली. सन 2017 मध्ये तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यांसह या विभागात कार्यरत असलेल्यांनी गणित, विज्ञान व इंग्रजीची पदे भरली म्हणून मान्यता दिली व शासनाची दिशाभूल केली.

आपल्याला अशा 10 पदांची माहिती मिळाली आहे.अजून किती पदे भरली गेली आहेत, याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. ती माहिती आम्ही लवकरच घेऊ, असेही  यावेळी  तांबे यांनी  स्पष्ट केले. हा घोटाळा आपण आयुक्‍तांच्या लक्षात आणून दिला आहे. त्यांच्याकडून चौकशी करण्यात येणार आहे, असे सांगतानाच या घोटाळ्याची पाळेमुळे मंत्रालयातील एका अधिकार्‍यापासून सुरु झाली असल्याचा आरोपही आकाश तांबे यांनी यावेळी केला.