Fri, Nov 16, 2018 04:28



होमपेज › Konkan › शिक्षक भरतीला मुहूर्त मिळेना

शिक्षक भरतीला मुहूर्त मिळेना

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 8:28PM



कणकवली : वार्ताहर

शिक्षक भरतीसाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या परीक्षेला एक वर्ष उलटत आले तरी अद्यापही शासनाने रिक्‍त जागांची संख्या व भरतीप्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळे शासनाला शिक्षक भरतीसाठी मुहूर्त मिळत नसल्याची संतप्त प्रक्रिया डी.एड. व बी.एड.धारकांमधून व्यक्‍त होत असून त्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे. गेल्या आठ वषार्ंपासून शिक्षक भरती झाली नसल्याने आता तरी मुहूर्त मिळणार काय? असा सवाल विचारला जात आहे. 

साडे तीनशे वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी शंभुराजांना गुरूंचा परिचय देताना  सांगितले की,  शेतकरी ज्याप्रमाणे एका जोंधळ्यातून हजारो जोंधळे निर्माण करतो त्याप्रमाणे एक शिक्षक एका ज्ञानबिंदूतून सागर निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. आज त्याच जिजाऊंच्या मातीत शिक्षक होणे नाही असे म्हणण्याची वेळ येतं आहे. हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याचे स्वप्न पाहणार्‍या भावी शिक्षकाचेच भवितव्य आता अंधःकारमय होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

गेल्या वर्षभरापासून शिक्षक भरती प्रक्रियेसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. पाच वर्षे पात्रता परीक्षानंतर अभियोग्यता परीक्षा देऊन स्वतःला पात्र सिद्ध करून नोकरी मिळणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. कारण परीक्षा झाली, निकाल पण लागला पण पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार की नाही याचीच प्रतीक्षा संपलेली नाही. गेली आठ वर्षे रखडलेली भरती प्रक्रिया पाहता शासनाचे शिक्षणाबाबतचे उदासीन धोरण दिसून येते.अधिवेशनात  शिक्षणमंत्र्यांनी 18000 शिक्षक भरती होणार, असे जाहीर केले होते. त्यातच 31ऑगस्ट 2018 चे शासन परिपत्रकानुसार खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  करण्यात यावे अशी जिल्हा परिषदजवळ मागणी करून एकप्रकारे गुणवत्ताधारकांवर अन्यायच केला आहे. त्यामुळे 26जून 2018 च्या शासनाच्या जीआर नुसार भारतीप्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार भरती करावी. तसेच भरतीचे सर्व अधिकार शासनस्तरावर होणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग रत्नागिरीसह कोंकणातील सर्व जिल्ह्यातून स्थानिक भरतीसाठी वारंवार शासनदरबारी पाठपुरावा करूनही  ठोस माहिती न देता केवळ टोलवा टोलवी चालली आहे. नेमक्या किती जागांसाठी भरती होणार?ती कधी होणार ?याचा कालबद्ध कार्यक्रम अजूनही निश्‍चितं झालेला नाही.भावी शिक्षकांच्या भावनांशी खेळण्याचा डाव शासन खेळत तर नाही ना अशी संतप्त प्रतिक्रया डी. एड. धारकांतून उमटत आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये गेले  तीन ते चार महिने शिक्षक भरतीसाठी आंदोलन सुरू आहे पण लोकप्रतिनिधींनी आश्वासनांपलीकडे काहीही केलेले नाही.

एनआयसी नुसार 50,000 पेक्षा अधिक टी ई टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 28,000 विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टल वर नोंदणी केली आहे. तसेच 1,93,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अभियोग्यता चाचणी दिली आह,पोर्टल वर नोंदणी ची प्रक्रिया पूर्ण होत आली असून अजूनही रिक्‍त जागांबाबत माहित देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भरती नाही. शिक्षकांच्या बहुवर्ग अध्यापनमुळे, अपुर्‍या शिक्षक वर्गामुळे ढासळत चाललेली गुणवत्ता पाहता पालकांमध्येही असंतोष आहे. गावपातळीपासून सर्वजण शासनाच्या या वेळकाढू धोरणाबाबत नाराज आहेत. मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचा क्रूरपणा शासनाने त्वरित थांबवून तत्काळ शिक्षक भरती करावी, अशी मागणी होत  आहे. 

येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल : भाग्यश्री रेवडेकर

कोकण डी. एड., बी. एड. धारक संघटनेच्या या वतीने स्थानिक शिक्षक भरतीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ही खेदाची बाब आहे पण शासन त्याची योग्य दाखल घेत नसेल तर यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा डी.एड., बी.एड.धारक संघटनेच्या कोकण उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर यांनी दिला.