Mon, Jan 27, 2020 11:06होमपेज › Konkan › लाखो डीएड्, बीएड् धारकांचा सवाल; शिक्षक भरती दीड वर्ष लांबलेलीच

कधी लावणार रे ‘तो’ व्हीडिओ?

Published On: May 18 2019 11:43PM | Last Updated: May 18 2019 11:43PM
रत्नागिरी : प्रमोद करंडे

राज्यभरातील सुमारे दहा लाख डीएड्, बीएड् धारकांचे लक्ष लागलेल्या शिक्षक भरतीचे घोडे दीड वर्षापासून अडले आहे. शिक्षण विभाग आणि राज्य शासनाकडून भरतीबाबतचा ‘पोर्टल-पोर्टल’चा खेळ अद्याप सुरू आहे. पवित्र मार्गाने भरती करण्याबाबतचा व्हीडिओ अवघ्या काहीच दिवसांत अपलोड होईल, अशी आश्‍वासने वारंवार दिली जात आहेत. त्यामुळे कधी येणार रे तो व्हीडिओ? असा सवाल राज्यभरातील भावी शिक्षक करू लागले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ ही टॅगलाईन खूपच लोकप्रिय झाली. भाजप सरकारच्या आश्‍वासनांची पोलखोल या माध्यमातून करण्यात आली. शिक्षक भरती करण्याबाबतची आश्‍वासने राज्यभरातील लाखो डीएड्, बीएड् धारकांना शिक्षण विभाग आणि राज्य शासनाने दिली होती. मात्र, अद्याप ती पूर्णत्वाकडे गेली नाहीत.

शिक्षक भरती कशा पद्धतीने होणार? शाळांचा प्राधान्यक्रम कसा निवडायचा? याबाबतचा व्हीडिओ अपलोड करण्यात येईल आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल, असे आश्‍वासन वारंवार देण्यात आले होते. मात्र दीड वर्ष उलटले तरी शिक्षक भरतीचा व्हीडिओ अद्याप अपलोड होण्याचे नाव घेत नाही. या व्हीडिओची उत्सुकता राज्यभरातील लाखो डीएड्, बीएड् धारकांना लागल्याने ‘कधी येणार रे तो व्हीडिओ?’ असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

विविध याचिकांच्या अडथळ्यामुळे शिक्षक भरती लांबत असल्याचे कारण दिले जात आहे. पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले. उमेदवारांची नोंदणी झाली असून सुमारे 12 हजार एक जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठीचे सॉफ्टवेअरदेखील तयार करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाच वेळी पाहता येणार असून, प्राधान्यक्रमदेखील नोंदविता येणार आहेत. त्यानंतर पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचे कारण सांगून पोर्टलचे स्थलांतर करण्यात आले.

या भरतीविरोधात याचिका दाखल करण्यात आल्याने या सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्यात येणार आहे. सर्व प्रकरणे निकाली काढल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उमेदवारांना संस्थांसाठी प्राधान्यक्रम भरता येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी गेल्या महिन्यात  दिली होती. तसा व्हीडिओही अपलोड करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे आता हा दीड वर्ष रखलेल्या या भरतीचा व्हीडिओ कधी अपलोड होणार,  याची उत्सुकता उमेदवारांना लागली आहे.