Fri, Apr 26, 2019 02:13होमपेज › Konkan › मृतदेह टाकण्यासाठी चोथेने आधीच हेरली होती जागा

मृतदेह टाकण्यासाठी चोथेने आधीच हेरली होती जागा

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 11:03PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरुव याला त्याच्या घरात ठार मारून त्याचा मृतदेह त्याच्याच गादी, उशीसह कावळेसाद दरीत फेकला होता.  पोलिसांनी शुक्रवारी हे साहित्य बाबल आल्मेडा टिमच्या मदतीने दरीबाहेर काढून पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आपण बदफैली असल्याचे पती विजयकुमारला समजल्यामुळेच, आपले बिंग फुटेल या भीतीने जयलक्ष्मीने प्रियकराच्या मदतीने त्याचा  काटा काढल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी शुक्रवारी सुरेश चोथे याला कावळेसाद येथे नेत त्याच्या कडून या प्रकरणी माहिती घेतली.  त्याने दिलेल्या माहितीनुसार कावळेसाद पॉईंट ही जागा पोल्ट्री चालक संशयित आरोपी सुरेश चोथे याने यापूर्वीच हेरून ठेवली होती. सहा महिन्यांपूर्वी मद्याच्या नशेत गडहिंग्लजमधील दोघा युवकांचा कावळेसाद पॉईंटवरील दरीत पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी भडगाव मधील बरेचसे पोल्ट्री मालक-चालक या पॉईंटवर आले होते. यात संशयित आरोपी सुरेश चोथे हाही होता. 

त्याने या पॉईंटमधून खाली टाकल्यानंतर काहीच मिळत नाही हे पाहिले होते. यामुळे विजयकुमार याचा मृतदेह टाकल्यानंतर तो कुणालाही सापडणार नाही असे समजून त्याने या पॉईंटची निवड केली होती. त्याने एकट्यानेच गाडीतून गादीत गुंडाळलेल्या मृतदेह ओढत दरीच्या  संरक्षक पाईपपर्यंत नेला आणि गादीसह मृतदेह दरीत फेकला. या  खून प्रकरणातील सह आरोपी मयताची पत्नी जयलक्ष्मी गुरव ही   मुलांना संशय येईल म्हणून बाहेर पडली नव्हती. दरम्यान, जयलक्ष्मी हिचे माहेर हे सौदत्ती येथे असून याठिकाणी देवदासीची प्रथा असल्याने तिचे अन्य कुणाशी प्रेमसंबंध होते काय याचाही तपास पोलिस करणार आहेत, असे डीवायएसपी दयानंद गवस यांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शीच्या मागावर पोलिस

शिक्षक विजयकुमार गुरुव याला दारू पाजून त्याला त्याच्याच बेडवर लोखंडी रॉडने मारून ठार मारल्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा शोधण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. गुरव यांच्या दोन मुलांपैकी एकाने खूुन झाल्याचे पाहिले असावे, असा अंदाज असून  त्यादृष्टीने पोलिस तपास करत असल्याचे डीवायएसपी गवस यांनी सांगितले. पुन्हा तपासासाठी गडहिंग्लजला पोलिस जाणार असून यावेळी चोथे याच्या पत्नी व मुलांसह त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करणार आहेत.