Sat, Mar 23, 2019 18:28होमपेज › Konkan › ‘पवित्र’च्या समस्यांचे निराकरण होईना

‘पवित्र’च्या समस्यांचे निराकरण होईना

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 08 2018 8:56PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरून राबवण्यात येणार आहे. हे पोर्टल शुक्रवारी सुरू झाले. पवित्र पोर्टलवर प्रत्येक स्तरावर माहिती भरण्यासाठीचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाभरातील डीएड्, बीएड् धारकांमधून करण्यात येत आहे.

इतर काही जिल्ह्यांमध्ये याची प्रशिक्षण शिबिरे पार पडली. मात्र रत्नागिरीत हे शिबिर झालेले नाही. यासाठी प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकार्‍यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे.  शिक्षण सेवक भरतीची कार्यवाही ई-गव्हर्नन्स सेलद्वारे राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. पवित्रचे कामकाज सुरू झाले आहे.   

शिक्षक पदासाठी अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांवरून भरती होणार आहे. त्या अनुषंगाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निश्‍चित केलेले आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे आसन क्रमांक आणि त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याचा दिनांक निश्‍चित केलेला आहे. दि. 6 जुलै ते 23 ऑगस्ट या कालावधीत ही नोंदणी होणार आहे. 

पवित्र पोर्टलद्वारे उमेदवार, संस्था व शासन स्तरावरून माहिती भरून घेऊन कार्यवाही करायची आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलमध्ये माहिती अचूक भरण्यासाठी कोणतेही मार्गदर्शन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले नाही. अनेक उमेदवारांना शंका येत आहेत. या शंका सोडवायच्या कशा? असा प्रश्‍न उमेदवारांसमोर आहे.