Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Konkan › जि.प.सह ग्रा.पं.कडूनही स्वतंत्रपणे कर आकारणी

जि.प.सह ग्रा.पं.कडूनही स्वतंत्रपणे कर आकारणी

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 10:02PMमालवण : प्रतिनिधी 

शासकीय योजनांच्या कामांची बिले काढताना जिल्हा परिषदेकडून विविध प्रकारच्या कराची आकारणी होत असतानाही ग्रामपंचायतीकडून स्वतंत्रपणे पुन्हा कर आकारला जात असल्याने हा ठेकेदारांवर अन्याय आहे. काही ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांकडून मनमानीपणे हा कर वसूल केला जात असल्याने याला आळा घालावा,अशी मागणी पं. स. सदस्य सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर यांनी पं. स. सभेत केली. यासंदर्भात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी दुबार कर आकारणी करू नये, यासाठी सूचना करण्याचे आदेश सभापती मनीषा वराडकर यांनी  अधिकार्‍यांना दिले.

मालवण  पं.स.मासिक सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात झाली.सभापती मनीषा वराडकर, जि.प. वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, उपसभापती अशोक बागवे, कृषी अधिकारी श्री. चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी रवींद्र कांबळे,सदस्य विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सुनील घाडीगावकर, सोनाली कोदे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

शासकीय योजनांसह आमदार, खासदार फंडातून होणार्‍या कामांची बिले काढताना जि.प.कडून विविध कराची आकारणी होते. यानंतरही ग्रा.पं.कडून कर आकारणी केली जात असल्याची बाब श्री. घाडीगावकर, श्री. परुळेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामपंचायतीकडून दुबार कर आकारणी केली जात असल्याने याचा तोटा संबंधित ठेकेदारांना सहन करावा लागत आहे. प्रत्यक्षात दुबार कर आकारणी करता येते का ?  अशी विचारणा श्री. घाडीगावकर यांनी केली. यावर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी दुबार कर आकारणी करता येत नसल्याचे स्पष्ट केले. तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मनमानीपणे दुबार कर आकारणी करत आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावरील चर्चेत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींना अशी दुबार कर आकारणी न करण्याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात असा आदेश सभापतींनी दिला.

मालोंड येथील शाळेस शिक्षक नसल्याने पालकांनी मुलांना येथील पंचायत समितीत आणल्याने पंचायत समितीची बदनामी झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यास लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे चित्र निर्माण झाले.या प्रकारामुळे तालुक्यातील अन्य पालकही असेच आंदोलन छेडतील. जर शिक्षण विभागाने संबंधित प्रशालेस, शाळा व्यवस्थापन समितीस शिक्षक नियुक्‍तीबाबतचे पत्र अगोदर दिले असते तर अशी स्टंटबाजी झाली नसती. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी सूचना श्री. घाडीगावकर यांनी केली.