होमपेज › Konkan › तळेबाजार तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

तळेबाजार तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:57AMदेवगड : प्रतिनिधी

सातबारा उतार्‍यावर खरेदी खतानुसार नोंद घालून सातबारा उतारा देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना तळेबाजार तलाठी सुनील सुरा राठोड (वय 42, रा. जामसंडे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेे. मंगळवारी दुपारी ही कारवाई देवगड तहसील कार्यालय परिसरामध्ये  करण्यात आली. या वर्षातील देवगड तालुक्यातील तलाठ्यावर झालेली अशा प्रकारची ही दुसरी कारवाई आहे.

तळेबाजार येथील एका शेतकर्‍याने जमीन खरेदी केली आहे. ती जमीन आपल्या नावावर होण्यासाठी व खरेदीखताची नोंद होण्यासाठी सदर शेतकर्‍याने तळेबाजार तलाठी कार्यालयामध्ये अर्ज केला होता.सदर जमीनीची सातबारावर नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी त्या शेतकर्‍याकडे तळेबाजार तलाठी सुनिल राठोड यांनी 25 हजाराची मागणी केली होती. तडजोडअंती 10 हजार रूपये देण्याचे ठरले.

याबाबत त्या शेतकर्‍याने लाचलुचपत विभाग सिंधुदूर्ग यांच्याकडे 20 ऑगस्ट रोजी तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून मंगळवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याचा सुमारास तहसील कार्यालय परिसरात तक्रारदाराकडून 10 हजार रकमेची लाच घेताना तलाठी सुनिल राठोड यांना लाचलुचपत विभागाच्या टीमने रंगेहाथ पकडले. देवगड तालुक्यात लाच घेताना तलाठ्यांना रंगेहाथ पकडण्याची या वर्षातील ही दुसरी कारवाई असून यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.