Wed, Jul 17, 2019 12:30होमपेज › Konkan › ... अन्यथा आरोग्य मंत्र्यांच्या दालनाबाहेर आंदोलन

... अन्यथा आरोग्य मंत्र्यांच्या दालनाबाहेर आंदोलन

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 9:10PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात उद्भवलेल्या लेप्टोसाथीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी पाठविलेल्या पथकातील बर्‍याच डॉक्टरांनी चांगले काम केले. मात्र, काही डॉक्टरांनी अजिबात काम केले नाही. उलट विचारणार्‍यांना उद्धट उत्तरे दिली, पदाधिकारी आदींचा अपमान केला, अशा डॉक्टरांवर कारवाई करावी यासाठी आपण आरोग्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. मात्र, अद्याप यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. येत्या आठ दिवसांत संबंधित डॉक्टरवर कारवाई झाली नाही तर आरोग्य मंत्र्यांच्या दालनाबाहेर आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्यासह आरोग्य समिती सदस्यांनी दिला. आरोग्य समितीची सर्वसाधारण सभा बॅ. नाथपै समिती सभागृहात आरोग्य समिती सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती सदस्य जेरॉन फर्नांडिस, उन्नती धुरी, राजेश कविटकर, श्रेया सावंत, शर्वाणी गांवकर, लक्ष्मण रावराणे, यशवंत परब, समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे सर्व खातेप्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

शनिवारी झालेल्या आरोग्य समिती सभेपूर्वी सभापती प्रीतेश राऊळ यांनी महिनाभरापूर्वी सिंधुदुर्गात उद्भवलेल्या लेप्टो साथीवेळी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्यात 10 डॉक्टरांचे एक पथक पाठविले होते. यातील काही डॉक्टरांनी अजिबात काम केले नाही आणि त्यांना दिलेल्या मुदतीपूर्वीच ते परत निघूनही गेले. काम करत नसल्याबाबत विचारणा केली असता आपल्याला उद्धट उत्तरे दिली. आपले कुणीच काहीही करू शकत नाही, अशा शब्दात उत्तरे दिली.  काम न करता पदाधिकार्‍यांना उलट उत्तरे देणार्‍या या डॉक्टरवर कारवाई करावी यासाठी आपण आरोग्य संचालकांसह आरोग्य मंत्र्यांकडेही तक्रार केली. मात्र अद्याप कोणातीच कारवाई केली नाही याबाबत सभागृहात नाराजीही व्यक्त केली.

आपण पाठपुरावा केला असून याबाबतचा अहवाल पाठविण्यास सांगितला असून तो अहवाल तयार झाला आहे. हा अहवाल तत्काळ शासनाकडे  पाठविला जाईल आणि संबंधित महाबळेश्‍वर येथील त्या डॉक्टरवर कारवाई केली जाईल. यासाठी आपण पाठपुरावा करू,असे आश्‍वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सभागृहात दिले.