Fri, Jul 19, 2019 22:02होमपेज › Konkan › ‘एनआरएचएम’ कर्मचार्‍यांना नियमित शासन सेवेत घ्या

‘एनआरएचएम’ कर्मचार्‍यांना नियमित शासन सेवेत घ्या

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 8:55PMओरोस : प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित शासन सेवेत सामावून घ्यावे तसेच भरतीमध्ये 50 टक्के आरक्षण मिळावे,  याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे सादर केले. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक भेटीसाठी आलेले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने निवेदन सादर केले. यात म्हटले आहे, राज्यात 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाले. जिल्ह्यात या अभियानातंर्गत 456 अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी या अभियानाचा मोठा सहभाग आहे. यातील सर्व कर्मचारी हे कंत्राटी स्वरूपाचे असून नियमित कर्मचार्‍यां प्रमाणेच पूर्णवेळ काम करत आहेत. मिळालेल्या अल्प मोबदल्यात शासनाने दिलेल्या सर्व कामकाजाची पूर्तता करत आहेत. प्रत्येक कर्मचार्‍याने 10 ते 12 वर्षे सेवा बजावली आहे.

एवढा कालखंड या सेवेत घालवल्यानंतर प्रत्येक वर्षी प्रतिनियुक्‍ती प्रक्रियेमध्ये काही अन्यायकारक बदल करण्यात येत आहेत. एनआरएचएमच्या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याच्या दृष्टीने सरकारने एक समिती नियुक्‍त केली आहे. या समितीने तीन महिन्यांत याबाबत शासनास अहवाल सादर करणे आवश्यक होते. परंतु आश्‍वासनाशिवाय कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र, या समितीचा निर्णय येण्यापूर्वीच शासन नवीन भरती प्रक्रिया राबवून पुनर्नियुक्‍तीमध्ये जाचक अटींद्वारे अनुभवी प्रशिक्षित कर्मचार्‍यांवर अन्याय करणार आहे. याबाबत एनआरएचएम् अभियानातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी अनेकवेळा आंदोलने, निदर्शने केली होती. मात्र, त्याकडे शासनाचा दुर्लक्ष होत असल्याने आज जिल्हा दौर्‍यावर आलेल्या माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे निवेदन देवून लक्ष वेधण्यात आले. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे, अजित सावंत, लीना आल्मेडा, समीक्षा चिंदरकर, क्रांती तोरसकर, नूतन तळगावकर आदी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.