Wed, Jun 26, 2019 11:37होमपेज › Konkan › #Women’sDayमहिला सक्षमीकरणासाठी झटणार्‍या स्वाती साळवी

#Women’sDayमहिला सक्षमीकरणासाठी झटणार्‍या स्वाती साळवी

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:43PMचिपळूण : प्रतिनिधी

‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हती’ अशी परंपरा पूर्वांपार चालत आली आहे. त्यामुळे महिलांची धाव कुटुंबाच्या पलिकडे गेली नाही. कोणत्याही क्षेत्रात महिलांना हस्तक्षेप करण्याची संधी नव्हती. मात्र, आज 73 व्या घटना दुरूस्तीने घर चालविणार्‍या महिलांना गाव चालविण्याची संधी मिळाली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांची सक्षम फळी उभारणार्‍या कापसाळ येथील अग्रीमा महिला संघाच्या सचिव आणि सीमांतिनी महिला संघाच्या अध्यक्षा त्याच पद्धतीने एकता महिला गाव विकास समिती आणि जय हनुमान महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती सुरेश साळवी यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

साळवी यांनी कापसाळ ग्रामपंचायत सदस्य म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि तेथून महिलांविषयी काहीतरी करण्याची त्यांच्यात इच्छा निर्माण झाली. अशावेळी त्यांना मार्गदर्शनाची व प्रशिक्षणाची गरज होती. नेमके अशाचवेळी परिवर्तन संस्थेने त्यांना मार्गदर्शनाचा हात पुढे केला. त्यानंतर त्यांनी मागे पाहिले नाही. पद असो वा नसो, काम करीत जायचे एवढाच ध्यास त्यांनी घेतला. 

पंधरा वाड्यांमध्ये विस्तारलेल्या कापसाळ गावामध्ये त्यांनी सामाजिक काम करण्याचा वसा घेतला. येथील माजी सरपंच प्राजक्‍ता केळसकर, मंजुषा साळवी, मीनल बांदेकर आदींच्या नेतृत्वाच्या साथीने एकता महिला ग्रामविकास समिती स्थापन केली आणि विविध विकासाचे उपक्रम राबविले. महिला संघटन उभे करण्यामध्ये त्यांनी यशस्वी प्रयोग केले. यामध्ये गावातील महिलांची त्यांना सक्षम साथ मिळाली. आयत्यावेळी निर्माण होणार्‍या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन त्याचे निराकरण करणे हे महिलांच्या साथीने सहजशक्य झाले. महिलांच्या प्रश्‍नाविषयी होणार्‍या कार्यशाळा, प्रशिक्षणे यामध्ये त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि त्याच पद्धतीने आपल्या गावात कार्य सुरू केले.

समितीच्या पुढाकाराने महिला सक्षमीकरण प्रक्रियेवर त्यांनी भर दिला आणि मजबूत संघटन उभे केले. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचे कार्ड मिळविण्यासाठी होणारा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणून संबंधित यंत्रणेला धारेवर धरत गहाळ झालेली स्मार्ट कार्ड पुन्हा मिळवून दिली. प्रभाग सभा घेणे, महिला दिनानिमित्त घेण्यात येणारे महिला मेळावे, महिलांच्या वैयक्‍तिक लाभाच्या योजनांचा प्रचार व प्रसार, स्वच्छता संदेश, आरोग्य योजना, महिला ग्रामसभा यशस्वी करणे, पर्यावरण समृद्ध गाव, वनीकरण आदी सामाजिक उपक्रमात त्यांनी पुढाकार घेतला. औषधी वनस्पती लागवड करून महिला मेळाव्यात अशा औषधी वनस्पतींचे वितरण करणे अशा पद्धतीने त्यांनी हजारहून अधिक औषधी वनस्पती वेगवेगळ्या समारंभात भेट दिल्या. हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने देण्यात येणार्‍या भेटवस्तू ऐवजी मसाला पिकांची रोपे खरेदी करून त्याचे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम त्यांनी राबविला.

सामाजिक काम करताना संसाराकडे दुर्लक्ष केले नाही. घरातील शेतीबरोबरच पापड, कुरडया, थालीपीठाचे पीठ, कुळीथ पीठ आदी वस्तू बनवून त्या विकणे, शोभिवंत वस्तू बनविणे अशा पद्धतीने त्यांनी आपल्या संसारालादेखील हातभार लावला. स्वत:चे शिक्षण कमी असले तरी मुलांना उच्चशिक्षण मिळाले पाहिजे, हा ध्यास त्यांनी घेतला आणि आदर्श पालकाची भूमिका बजावली. राजकारणात राहून समाजकारण कसे करता येते यावर स्वाती साळवी यांनी भर दिला. तालुका संघटनेवर कार्यरत असून प्रशासकीय पातळीवरील संघर्षासाठी त्या पुढाकार घेतात.