Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Konkan › दूरसंचारच्या समस्यांचा स्वच्छ भारत अभियानास फटका!

दूरसंचारच्या समस्यांचा स्वच्छ भारत अभियानास फटका!

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 11 2018 11:14PMविशेषवृत्त : हरिश्‍चंद्र पवार

मोदी सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा नापास झाला असून आठ लाख लोकसंख्येपैकी केवळ 29 हजार 592 अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहेत. मागास आणि दुर्गम असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुमारे 28 कोटी रुपयांचा निधी शौचालय बांधकामासाठी खर्च झाला असून दूरसंचार कंपनीचे मोबाईल नेटवर्क जिल्ह्यात सर्वत्र पोहोचू शकले नसल्यामुळे हा अ‍ॅप डाऊनलोड करता आलेला नाही. या सर्वांचे खापर दुरसंचारवर फोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात स्वच्छता सर्वेक्षणांमध्ये सार्वजनिक आणि घरगुती शौैचालय बांधकामासाठी लागणारे साहित्य हे दुर्गम भागांमध्ये पोहोचू शकते. मात्र, मोबाईल नेटवर्क पोहोचू शकत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला ऑनलाईन दाखले देणारा पेपरलेस  जिल्हा असून या जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये अद्यापही दूरसंचारची सेवा पोहोचलेली नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कोकण विभागात रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय स्तरावर स्वच्छता अभियानामध्ये अव्वल ठरलेल्या सिंधुदुर्ग स्वच्छता अ‍ॅपद्वारे स्वच्छते विषयी प्रश्‍न नागरिक आणि ग्रामस्थ मांडू शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती समोर आली आहे. राज्यस्तरीय नाशिक, कोल्हापूर, सातारा तर विभागस्तरावर कोकणात रायगड, विदर्भ, मराठवाडामध्ये उस्मानाबाद, बुलढाणा, चंद्रपूर, अहमदनगर आणि पुणे विभागात कोल्हापूर जिल्हे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट कार्य केलेले जिल्हे आहेत. 1  ते 30 ऑगस्ट या काळामध्ये स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये  राबविण्यात आली.  या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व जनतेने सहकार्य करून अ‍ॅप डाऊनलोड करावे व आपली मते नोंदवावीत, असे आवाहन जि.प. कार्यकारी अधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी केले होते.मात्र नेटवर्कमुळे या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छ मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक व संख्यात्मक मानांकनाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आला होता. हे सर्वेक्षण स्वच्छते संदर्भातील घटकांबाबत करण्यात आले असून त्यासाठी गुणांकन पद्धत शासनाकडे निश्‍चित करण्यात आली होती. जास्त गुण मिळणार्‍या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरा वर 2 ऑक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,प्रार्थनास्थळे,यात्रास्थळे, बाजारतळ अशा सर्व ठिकाणांची तपासणी करून स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले होते. या स्वच्छता सर्व्हेक्षणामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील प्रभावी व्यक्ती आपले मत प्रत्येक व्यक्‍तीने मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रतिक्रिया नोंदवायची  होती. परंतु या परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मात्र नापास झाला आहे.