Wed, Mar 27, 2019 03:59होमपेज › Konkan › कणकवलीत स्वाभिमान पक्ष कार्यकर्त्यांचा जल्‍लोष!

कणकवलीत स्वाभिमान पक्ष कार्यकर्त्यांचा जल्‍लोष!

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 8:45PMकणकवली : वार्ताहर

कणकवली न.प.वर नगराध्यक्षपदासह निर्विवाद सत्‍ता आल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात एकच जल्‍लोष केला. फटाके, ढोल-ताशे, गुलालाची उधळण करत आणि जोरदार घोषणा देत भव्य मिरवणूक शहरात काढली. मोठया संख्येने कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाजवळ सुरु झालेली ही मिरवणूक महामार्ग, मुख्य चौक, बाजारपेठ ते पटकीदेवी मंदिर येथून नगरपंचायतीजवळ पोहोचली. त्यानंतर आ.नितेश राणे यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांचा फोटो नगराध्यक्षांच्या दालनात सन्मानाने बसविण्यात आला. 

‘कोण आला रे कोण आला, स्वाभिमानचा वाघ आला, नितेश राणे अंगार है’ अशा घोषणांनी गुरूवारी दुपारी कणकवली शहर दणाणून गेले. स्वाभिमानचे नगरसेवकपदाचे उमेदवार एका पाठोपाठ एक निवडून येत होते. मात्र, नगराध्यक्षपदासाठी समीर नलाडवे, संदेश पारकर यांच्यात घासाघीस सुरू होती. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांमध्ये घालमेल सुरू होती. समीर  नलावडे हे 37 मतांनी विजयी झाल्याचे आणि 11 नगरसेवक निवडून आल्याचे जाहीर झाल्यानंतर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

या जल्लोषात आ.नितेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, अशोक सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

समीर नलावडेंना आनंदाश्रू

नगराध्यक्षपदासाठी प्रचंड घासाघीस सुरू होती, शेवटची फेरी संपल्यानंतर  37 मतांनी विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर समीर नलावडे यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडत होता. सहकार्‍यांसमवेत ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांजवळ पोहोचले. जिंकल्याचा प्रचंड आनंद मनात सामावलेला असताना आपली प्रतिक्रिया व्यक्‍त करताना समीर नलावडे यांना अश्रू आवरता आले नाहीत.

मिरवणुकीला प्रारंभ

समीर नलावडेंसह विजयी 11 उमेदवारांची भव्य मिरवणूक तहसील कार्यालयाजवळून काढण्यात आली. नरडवे रोड येथून कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत ही मिरवणूक महामार्गावर पोहोचली. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोलताशांच्या गजरात बेभान झालेले कार्यकर्ते जोरदार जल्लोष करत होते.

शिवसेना कार्यालयासमोर आ. नितेश राणे थांबले

स्वाभिमानची मिरवणूक नरडवे रोड येथून महामार्गावरून मुख्य चौकाच्या दिशेने सुरू झाली.मिरवणूक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर आली असता अग्रभागी असलेल्या आ.नितेश राणे यांनी काही क्षण थांबत कार्यालयाच्या दिशेने नजर फिरविली. निवडणुकीतील विजयानंतर करून दाखविल्याचा इशारा आ.राणे यांनी दिला.

मिरवणुकीत खा. नारायण राणे यांचा फोटो 

जल्लोष करत मिरवणूक बसस्थानकासमोरील स्वाभिमानच्या कार्यालयाजवळ आली असता कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा फोटो मिरवणुकीत आणला. आ. नितेश राणे यांनी तो फोटो हातात घेत उंचावल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

महामार्गावर वाहतुकीची कोंडी

मिरवणुकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने महामार्गावरील एका बाजुची वाहतूक पुर्णत: बंद झाली होती. त्यामुळे महामार्गावर वागदे आणि जानवलीच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मिरवणूक मुख्य चौकातून बाजारपेठेच्या दिशेने गेल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

Tags : Konkan, Swabhimani Paksha, enjoys, victory, Kankavli