Mon, Nov 19, 2018 13:27होमपेज › Konkan › मच्छीमार्‍यांच्या जाळ्यात सापडले संशयास्पद पाकीट

मच्छीमार्‍यांच्या जाळ्यात सापडले संशयास्पद पाकीट

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 10:51PMमालवण : वार्ताहर

मालवण- दांडी समुद्रात मच्छीमारीसाठी टाकण्यात आलेल्या रापणीच्या जाळ्यांमध्ये काळ्या रंगाचे चिकट पदार्थ असलेले पाकीट सापडले आहे. या पाकिटावर ‘888’ या अंकासह अरेबिक भाषेतील ओळी असून या संशयास्पद पाकिटामुळे किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे. 

मालवण पोलिसांनी हे पाकीट ताब्यात घेतले असून पाकीट सापडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. समुद्रातून किनार्‍यावर येणार्‍या संशयास्पद वस्तूंबाबतची माहिती मच्छीमारांसह नागरिकांनी तत्काळ पोलीस विभागाला देण्याचे आवाहन सातत्याने पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे.मंगळवारी सायंकाळी दांडी समुद्रात मेस्त रापण संघाने मासेमारीसाठी जाळी टाकली. रात्री उशिरा ही जाळी किनार्‍यावर ओढल्यानंतर जाळ्यात मासळीसोबत काळ्या रंगाचे एक पाकीट मच्छीमारांना आढळून आले. ते पाकीट जाळ्यातून बाहेर काढल्यानंतर पाकिटातून उग्र वास येऊ लागला. या पाकिटावर 888 असा अंक असून त्यावर अरेबिक भाषेत प्रिंट केलेली अक्षरे आहेत. तसेच या पाकिटावर गरुडाचे चित्र आहे. या पाकिटात चिकट पदार्थ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दांडी भागातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी बुधवारी सकाळी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर  पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, हवालदार नीलेश सोनावणे व संतोष गलोले यांच्या  पथकांने दांडी किनारी जात ते पाकीट ताब्यात घेतले.