Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › कातवणेश्‍वर समुद्र किनारी संशयास्पद पाकिटे

कातवणेश्‍वर समुद्र किनारी संशयास्पद पाकिटे

Published On: Jul 29 2018 11:13PM | Last Updated: Jul 29 2018 11:05PMदेवगड ः प्रतिनिधी

कातवणेश्‍वर समुद्र किनारी पोत्यामध्ये बेवारस स्थितीत  19 पाकिटे आढळली असून पाकिटांवर उर्दू भाषेत लिखाण असल्याने  खळबळ उडाली. मात्र, तपासणीअंती पाकिटांमध्ये असलेला द्रव पदार्थ स्फोटके अथवा अमली पदार्थ नसल्याचा निर्वाळा सुरक्षा यंत्रणेने दिला आहे, तरीही फॉरेन्सिक लॅबकडून आलेल्या अहवालानंतरच बेवारस पाकिटांचे गूढ उकलणार आहे.

कातवणेश्‍वर समुद्र किनारी रविवारी सकाळी 10 वा. च्या सुमारास सागर सुरक्षा रक्षक तेजस धुरत याला बेवारस स्थितीत असलेले एक  पोते आढळले. या पोत्यामध्ये पाकिटे आढळल्याने त्यांनी तत्काळ देवगड पोलिस स्टेशनला कळविले.त्यानुसार पोलिस उपनिरिक्षक पूनम आसवले, पोलिस नाईक राजन पाटील, प्रशांत जाधव, पो.कॉ.अमोल बुरटे, मनोज पुजारे, सुप्रिया भागवत यांनी घटनास्थळी जावून बेवारस पोते ताब्यात घेतले.यामध्ये 19 पाकिटे आढळली त्यामध्ये असलेल्या द्रव पदार्थाला उग्र वास येत होता.तर पाकिटांवर उर्दू भाषेत  लिहिले होते.पोलिसांनी यासाठी उर्दू भाषिकाची मदत घेतली. त्यांनी पाकिटावर  याकीब शकीब लिहिले असल्याचे पोलिसांना सांगितले.

संशयास्पद पाकीटे आढळल्याने पोलिसांनी बाँबशोधक नाशक पथकाला पाचारण केले. देवगडमध्ये हे पथक दुपारी 3 वा. दाखल झाले.या पथकाने देवगड पोलिस स्टेशनला  येवून पाकिटांची तपासणी केली व पाकिटांमधील द्रव पदार्थ हा स्फोटके अथवा अंमली पदार्थ नसल्याचे सांगितले. मात्र, या पाकिटांमधील द्रव पदार्थाचा नमुना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मिळालेल्या पाकिटांबद्दलचे गुढ उलगडणार आहे.

यापूर्वीही कुणकेश्‍वर, मुणगे समुद्र किनारी पाकिस्तानी राईस असलेली गोणी सापडली होती.पावसाळ्यामध्ये किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्यातून वाहून आलेल्या संशयास्पद वस्तू यापूर्वीही मिळाल्या आहेत. त्यामुळे कातवणेश्‍वर समुद्र किनारी मिळालेल्या संशयास्पद पाकिटांचा उलगडा फॉरेन्सिक लॅबकडून आलेल्या अहवालानंतरच होणार आहे.