Tue, Jul 23, 2019 16:43होमपेज › Konkan › देवगड एसटी आगारातील तीन वाहक-चालक निलंबित

देवगड एसटी आगारातील तीन वाहक-चालक निलंबित

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 11:21PMदेवगड : प्रतिनिधी

दैनंदिन कामकाजात अनियमितता व अडथळा आणणे तसेच कर्तव्यात कसूर करणे आदी आरोपांखाली देवगड एसटी आगारातील तीन चालक व वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तिन्ही कर्मचार्‍यांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता त्यांचे निलंबन केल्याचा आरोप करत एसटी कर्मचार्‍यांनी कारवाई विरोधात  संताप व्यक्‍त केला आहे.

देवगड आगारात गेले काही दिवस कर्मचारी व अधिकारी यांच्यात असंतोष खदखदत आहे.  अनेक तक्रारी आगारप्रमुखांकडे असून यातील काही तक्रारींची खातरजमा केल्यानंतर आगार व्यवस्थापनाने कारवाईचे पाऊल उचलल्याचे समजते. कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये चालक के. पी. थोटे व वाहक डी. पी पवार, एस. एन. फाळके यांचा समावेश आहे. पैकी श्री. थोटे व श्री. पवार यांच्यावर दैनंदिन कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप असून त्यांचे निलंबन आगार व्यवस्थापकांनी केले आहे. तर देवगड- बोरिवली एसटीला काही दिवसांपूर्वी चिपळूण येथे  अपघात झाला होता. या अपघातात वाहक श्री. फाळके यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने त्यांचे कणकवली विभाग नियंत्रकांनी निलंबन केले आहे.