होमपेज › Konkan › रिफायनरीच्या जमीन मोजणीला स्थगिती द्या

रिफायनरीच्या जमीन मोजणीला स्थगिती द्या

Published On: Dec 17 2017 1:27AM | Last Updated: Dec 16 2017 10:51PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार गावी प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असतानाही शासनाने प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार्‍या जमिनीची मोजणी सुरू केली आहे. या मोजणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरातील गावांमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून सध्या हा विषय अधिवेशनातही गाजत आहे. अगदी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी या प्रकल्पाविरोधात विधानभवनाबाहेर निदर्शने केली आहेत. रिफायनरी प्रकल्पाला कडाडून विरोध असताना दुसरीकडे शासन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न करत आहे. प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार्‍या जमिनीची मोजणीही शासनाने सुरू केली होती. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी मोजणीला कडाडून विरोध केला. त्यामुळे सद्य:स्थितीत मोजणीचे काम तात्पुरते थांबविण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर जमीन मोजणीचे काम तात्काळ थांबविण्याची मागणी आमदार खलिफे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

नाणार परिसरातील 14 गावांमध्ये हा प्रकल्प होणार असला तरी या प्रकल्पामुळे या गावांसह परिसराचे नैसर्गिक संतुलन बिघडणार आहे. या परिसरातील इको सेन्सिटिव्ह झोन व लगतच असलेला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पाहता नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारल्यास त्याचे गंभीर परिणाम मत्स्य व्यवसाय व आंबा, काजू बागायतींवर होणार आहे. प्रकल्पामुळे या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट होणार असून अनेक लोक विस्थापित होणार आहेत. त्यामुळे भूसंपादनाला स्थानिकांचा तीव्र विरोध असून स्त्री-पुरूष, वयोवृद्ध, मुले रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. तरी नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करावा, तसेच मोजणीला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी आ. खलिफे यांनी केली आहे.