Thu, Nov 15, 2018 05:49होमपेज › Konkan › तरुणाचा संशयास्पद मृतदेह

तरुणाचा संशयास्पद मृतदेह

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 10:23PMसिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी 

गुरुवारी रानबांबुळी-पालकरवाडी (सटवीचे गाळू) या जंगलमय भागात हात व पायाचे पंजे नसलेल्या अवस्थेत एक पुरुष मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह 31 मे 2018 पासून बेपत्ता असलेल्या मूळ बागलकोट (कर्नाटक) येथील आनंद पांडुरंग राठोड (वय 30, सध्या रा. सिंधुदुर्गनगरी) यांचा असल्याचे उघड झाले आहे. मात्र, हा घातपात असल्याचा आरोप राठोड याच्या कुटुंबाने केला आहे.

आनंद पांडुरंग राठोड हे 31 मे रोजी कामानिमित्त कसाल येथे गेले होते. मात्र, ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबाने ओरोस पोलिस ठाण्यात आनंद बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, गुरुवारी रानबांबुळी-पालकरवाडी सटवीचे गाळू या जंगलमय भागात काहीतरी कुजल्याची दुर्गंधी येऊ लागली. याबाबत रानबांबुळी पोलिसपाटील प्रकाश मुणगेकर यांनी त्या जंगल भागात जावून पाहणी केली. त्यांना हात आणि पायाचे पंजे नसलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मुणगेकर यांनी याबाबतची खबर ओरोस पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हा मृतदेह बेपत्ता आनंद राठोड यांच्याशी मिळताजुळता असल्याचा अंदाज आल्याने पोलिसांनी आनंद यांच्या कुटुंबाला बोलावून घेतले. आनंद यांची आई व भाऊ यांनी हा मृतदेह बेपत्ता आनंद यांचा असल्याचे खात्रीशीर सांगितले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. 

शवविच्छेदनानंतर होणार स्पष्ट

मृतदेहाची ओळख पटली असली तरी आनंद यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मृतदेहाची स्थिती पाहता हा घातपात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.  शवविच्छेदन झाल्यावर हा मृत्यू नेमका कशामुळे झाला ?  की घातपात ?याबाबत स्पष्टता होणार असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.