Wed, Jul 17, 2019 00:12होमपेज › Konkan › सुरेश प्रभू यांची लोकसभा निवडणुकीची तयारी!

सुरेश प्रभू यांची लोकसभा निवडणुकीची तयारी!

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 8:32PMगणेश जेठे
 

केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी विकास प्रकल्पांचा आढावा घेणे, ते मार्गी लावणे यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या काही दिवसात त्यांचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दौरे, कार्यक्रम वाढले आहेत. यावरून ना. प्रभू येणार्‍या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून रिंगणात उतरणार हे निश्‍चित मानले जात आहे. प्रभू निवडणुकीत उतरलेच तर त्यांना शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांच्याशी लढावे लागणार आहे. या लढाईत माजी मुख्यमंत्री  खा. नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाची भूमिका काय असेल यावरच या निवडणूक लढाईचे स्वरूप अवलंबून आहे.

बरोबर आणखी सात महिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यामुळे आतापासूनच निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. पावसाळा संपताच राजकीय वातावरण तापू लागेल. या लोकसभा निवडणुकीत  2014 सालच्या निवडणुकीप्रमाणे भाजप-शिवसेनेची युती राहील का? हा प्रश्‍न आहे. संसदेत भाजपच्या मोदी सरकारवरील अविश्‍वासदर्शक ठरावावेळी शिवसेनेने सत्तेत सहभागी असूनदेखील तटस्थपणाची भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेने मोदी सरकारला पाठिंबा द्यायला हवा होता अशी अपेक्षा असलेला भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर नाराज आहे. या नाराजीतूनच शिवसेनेला सोबत न घेण्याचा विचार आता भाजपच्या गोटात गांभीर्याने सुरू असल्याची चर्चा आहे. याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकमेकांसमोर लढण्याचीच शक्यता अधिक आहे. ही शक्यता असल्यानेच केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू भाजपकडून या मतदारसंघात उतरणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे.

अर्थशास्त्रज्ञ असलेले सुरेश प्रभू मालवणचे सुपूत्र आहेत. सारस्वत बँकेचे अध्यक्ष म्हणून काम केलेल्या प्रभू यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळच्या राजापूर लोकसभा मतदारसंघातून 1996 सालच्या लोकसभा निवडणुकीत उतरवले आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यावेळच्या युती सरकारमध्ये मंत्री असलेल्या व शिवसेना नेते असलेले नारायण राणे यांच्यावर टाकली. खासदार म्हणून प्रभू निवडून आले आणि केंद्रात मंत्रीही झाले. अनेक खात्यांचा कारभार त्यांनी सक्षमपणे सांभाळला.1996 ते 2009 सालापर्यंत 13 वर्षे प्रभू या भागाचे खासदार होते. या काळात ते तीनवेळा निवडून आले. राजापूर मतदारसंघाच्या गावागावात ते पोहोचले होते. पण राणे यांनी 2005 सालात शिवसेना सोडली आणि प्रभू मतदारसंघापासून दुरावत गेले.

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार दिल्लीत सत्तेवर आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरकारमध्ये अभ्यासू आणि सक्षम व्यक्‍तींची मंत्रिमंडळात गरज वाटली. यातूनच विविध क्षेत्राचा प्रचंड अभ्यास असलेल्या सुरेश प्रभू यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले. सुरुवातीला रेल्वे खाते आणि आता वाणिज्य व उद्योग खाते सोपविण्यात आले. भाजपने प्रभू यांना राज्यसभेचे खासदार बनविले आहे.

वर्षभरापूर्वी जिल्हा मुख्यालय पत्रकारांची टीम दिल्ली दौर्‍यावर गेली असताना पत्रकारांनी रेल्वेमंत्री असलेल्या सुरेश प्रभू यांची रेल्वे भवनमधील कार्यालयात भेट घेतली. भेटण्यासाठी आलेल्या इतर लोकांना आपल्या राजापूर मतदारसंघाबद्दल ते पुन्हा पुन्हा सांगत होते. आपल्या मतदारसंघाबद्दल ते भावूक झाल्याचे दिसत होते. याच मतदारसंघात पुन्हा निवडणुकीत उतरण्याची मनाची तयारी प्रभू यांनी केली असावी, असे वाटते. अलिकडे सुरेश प्रभू यांचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दौरे वाढले आहेत. सभा, बैठका, कार्यक्रम सुरू झाले आहेत. विविध क्षेत्रातील लोकांशी पत्रव्यवहार सुरू झाले आहेत.

ना. प्रभू लोकसभा निवडणुकीत उतरले तर शिवसेनेचे खा. राऊत यांच्याशी त्यांची लढत अटळ आहे. त्यातही स्वाभिमान पक्ष भाजपसोबत राहिला आणि स्वाभिमान पक्षाने आपला उमेदवार लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला तर स्वाभिमान पक्षाची ताकदही प्रभू यांना मिळू शकते. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत राणे हे प्रभू यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी काँग्रेसकडून  नीलेश राणे लोकसभेवर निवडून गेले होते. आता स्वाभिमान पक्ष भाजपसोबत राहिला आणि भाजपने प्रभू यांना निवडणुकीत रिंगणात उतरविले तर मात्र राणे यांची ताकद प्रभू यांना मिळू शकते. तसे घडलेच तर, प्रभू विरुद्ध राऊत अशी ‘काँटे की टक्‍कर’ अटळ आहे.