सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या बूथप्रमुख व कार्यकर्त्यांचा मेळावा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत राजवाड्याच्या प्रांगणात सायंकाळी 2.30 वाजता होणार आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी केले आहे. दरम्यान, या मेळाव्यात पुढील 2019 या वर्षी होणार्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला, दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात भाजपची वाढती ताकद पाहता हा मेळावा भाजप कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा ठरणार आहे. या मेळाव्यात भाजपच्या नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार होणार आहे. तिनही तालुक्यांत भाजपची ताकद वाढत असताना जि.प., पं.स. व नगरपरिषदांमध्येही भाजपने मुसंडी मारली, त्याचबरोबर भाजपप्रणित सरपंच व उपसरपंच यांचीही संख्या वाढली आहे.या कार्यकर्ता मेळाव्यातून आगामी महासंग्रामाची तयारी केली जात आहे. जिल्ह्याचे एक केंद्रीय मंत्री व राज्याचे अर्थमंत्री एकाच व्यासपीठावर आल्यामुळे हा मेळावा भाजपच्या कार्यकर्त्यांत उर्जितावस्था येऊन मरगळ दूर होणार आहे, असे राजन तेली म्हणाले.