Mon, Apr 22, 2019 12:20होमपेज › Konkan › अपात्रतेप्रकरणी संपदा वाघदरेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

अपात्रतेप्रकरणी संपदा वाघदरेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

Published On: May 18 2018 11:16PM | Last Updated: May 18 2018 11:15PMलांजा : प्रतिनिधी

अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्र ठरवण्यात आलेल्या येथील माजी नगराध्यक्षा संपदा वाघदरे यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. याप्रकरणी राज्य शासनाला नोटीस पाठवून वस्तुस्थिती अहवाल मागवण्यात आल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. या निर्णयामुळे वाघदरे यांचे नगरसेविकापदही अबाधित राहिले आहे. येथील नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी असताना संपदा वाघदरे यांच्याविरोधात शिवसेना गटनेते सुनील कुरूप यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती.

यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी संपदा वाघदरे यांना नगराध्यक्षपदासाठी अपात्र ठरवले होते. या कारवाईनंतर वाघदरे यांनी राज्य शासनाकडे दाद मागितली. तेथे हे प्रकरण सात महिने चालले. त्यानंतर वर्षभरासाठी त्यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्यात आली. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर तेथे वाघदरे यांना पुन्हा अपात्र ठरवण्यात आले होते. दरम्यान, या निर्णयाविरोधातही संपदा वाघदरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

शुक्रवारी या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने वाघदरे यांना दिलासा दिला आहे. या प्रकरणी राज्य शासनाला नोटीस पाठवून वस्तुस्थिती जाणून घेण्यात येईल, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. तोपर्यंत वाघदरे यांच्यावर झालेली कारवाई स्थगित करण्यात आली असून, त्यांचे नगरसेविकापद अबाधित राहिले आहे. दरम्यान, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे लांजा शहर विकास आघाडीमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.