Tue, Apr 23, 2019 22:28होमपेज › Konkan › अभ्यासाच्या गोडीसाठी ‘पूरक आहार’

अभ्यासाच्या गोडीसाठी ‘पूरक आहार’

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:34PMसावर्डे : वार्ताहर

जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शासनाने पटसंख्या वाढावी म्हणून शालेय पोषण आहार सुरू केला. परंतु, निकृष्ट दर्जाचा आहार, तुटपुंजे अनुदान यामुळे ही योजनासुद्धा रडतखडत सुरू आहे. याला पर्याय म्हणून चिपळूण तालुक्यातील नायशी येथील एका शाळेने विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून पूरक पोषण आहार योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे लोकसहभागातून हा आहार विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे विभागातील नायशीमध्ये जि. प. प्राथमिक मराठी शाळा आहे. या ठिकाणी या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ दि. 3 जुलै रोजी करण्यात आला. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या आर्थिक हातभारातून पूरक पोषक आहार मिळणार आहे. प्राथमिक शाळेमध्ये पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुद‍ृढ राहावे, शाळेतील त्यांची उपस्थिती वाढावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी हे पाऊल टाकले आहे. 

शालेश पोषण आहार सुरू असतानादेखील विद्यार्थ्यांना हा पूरक आहार दिला जाणार आहे. त्याचे आठवड्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. सोमवारी फळे, मंगळवारी दूध, बुधवारी अंडी, गुरुवारी चिक्‍की, शुक्रवारी अंडी व शनिवारी बिस्कीट देण्यात येणार आहे. यासाठी चाकरमान्यांचा हातभार लागला आहे. लोकसहभागातून संपूर्ण वर्षाच्या खर्चाची जबाबदारी गावातीलच व्यक्‍तींनी उचलली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराबरोबरच अन्य मधल्या वेळी पूरक पोषण आहार मिळणार आहे. जिल्हाभरातील मराठी शाळांपैकी नायशीमध्ये हा पहिलाच उपक्रम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेत येण्याची गोडी निर्माण होणार आहे. येथील सरपंच किशोर घाग यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून शिक्षक जागुष्टे व अजय जाधव यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. 
पूरक पोषण आहारामुळे विद्यार्थी शाळेत येऊन पटसंख्या वाढेल व विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल, असा विश्‍वास येथील शिक्षकांनी व्यक्‍त केला.