होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात ऊस तोडणी यंत्र दाखल (video)

सिंधुदुर्गात ऊस तोडणी यंत्र दाखल (video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली -वार्ताहर

ऊस उत्पादकांसाठी वरदान असलेले ऊस तोडणी यंत्र सिंधुदुर्गात दाखल झाले आहे.सिंधुदुर्ग बँक व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून दाखल झालेल्या या यंत्राच्या सहाय्याने मालवण तालुक्यातील वेरळ गावात ऊस तोडणी सुरू करण्यात आली आहे. यंत्राद्वारे होत असलेल्या ऊस तोडणीची सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शनिवारी पाहणी केली.

तोडणीसाठी कामगार मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मालवण-वेरळ येथील ऊस कामगार नसल्याने तोडायचा राहिला होता. माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर व पं.स. सदस्य छोटू ठाकुर यांच्या पाठपुराव्यातून तसेच सिंधुदुर्ग बँक व डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून निपाणी येथून ऊस तोडणी यंत्र मागविण्यात आले. मसुरे -मार्गाची तड येथे आलेल्या यंत्राद्वारे शनिवारी दिलीप बागवे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु करण्यात आली. दिवशी 120 टन ऊस तोडणीची क्षमता या यंत्रात आहे.

मसुरे परिसरात शिल्लक असलेला ऊस या यंत्राच्या सहाय्याने तोडून कारखान्याकडे पाठविला जाणार आहे. सिंधुदुर्गात सर्वप्रथम शनिवारी वेरळ गावात यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणीला सुरूवात झाली. त्याची पाहणी करताना  माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर पं. स. सदस्य छोटू ठाकूर, सरपंच लक्ष्मी पेडणेकर,  पुरुषोत्तम शिंदे, जग्गू टेलर, शेतकरी दिलीप सावंत,  पांडुरंग सावंत तसेच साखर कारखान्याचे एस.एस. पवार, भागोजी शेळके, प्रवीण रासम आदी उपस्थित होते.

 सतीश सावंत म्हणाले, ऊस तोड कामगारांची टंचाई असल्याने उत्पादक शेतकर्‍यांसमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र पश्‍चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता सिंधुदुर्गातही यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरू करण्यात आली आहे. पुढील हंगामात कणकवली, वैभववाडी परिसरात दोन ते तीन यंत्रे ऊस तोडणीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांनी चार मीटर सरीने ऊस लागवड व ऊसातील तणाची साफसफाई यावर लक्ष देणे आवश्यक आहे. 

ऊस शेतीचे क्षेत्र विस्तारण्यास तोडणी यंत्राची मदत होणार  असून शेतकर्‍यांकडे आर्थिक समृध्दी येणार आहे, असे सांगितले.  यावेळी शेतकर्‍यांनी नदीतील गाळामुळे पुराचे पाणी शेतामध्ये घुसून नुकसान होते आदी समस्या सतीश सावंत यांच्याकडे मांडल्या. 


  •