Tue, May 21, 2019 00:27होमपेज › Konkan › हर्णे-पाजपंढरीत अचानक त्सुनामी

हर्णे-पाजपंढरीत अचानक त्सुनामी

Published On: Sep 06 2018 10:08PM | Last Updated: Sep 06 2018 8:58PMरत्नागिरी : भालचंद्र नाचणकर

दापोलीतील हर्णे-पाजपंढरी समुद्र किनारी अचानक त्सुनामी आली. तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) समुद्रात खडकाचा आधार घेवून जीव वाचवणार्‍या तिघा ग्रामस्थांना सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. अनेक रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. या आपत्तीत मदत करण्यासाठी महसूलसह पोलिस, तटरक्षक दल, मत्स्य व्यवसाय विभाग, महावितरण, पतन, अग्निशामक दल, आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची धावपळ उडाली.

हर्णे-पाजपंढरी समुद्र किनारी त्सुनामी आपत्ती येणार असल्याचा संदेश मिळाल्यानंतर महसूल विभागाकडून मदत कार्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व विभागांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर पुण्यातील ‘एनडीआरएफ’लाही कळवण्यात आले. गेल्या सोमवारी या आपत्तीची शक्यता असल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर तातडीने ‘एनडीआरएफ’लाही कळवण्यात आले. ही खबर मिळताच सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. सकाळी 11.30 वाजता समुद्र किनारी उंचच्या उंच लाटा उसळू लागल्या. पाजपंढरीचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय असल्याने काही कल्पना नसलेले ग्रामस्थ मासेमारी करण्यासाठी गेले होते.

समुद्रात उसळणार्‍या उंच लाटांचे पाणी किनार्‍या लगतच्या वस्त्यांमध्ये घुसू लागले. मदतीसाठी तत्पर असणार्‍या सर्व यंत्रणांना महसूल विभागाकडून कळवण्यात आल्यानंतर पोलिस, तटरक्षक दल, मत्स्य व्यवसाय व इतर आवश्यक सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आवश्यक ती मदत घेऊन समुद्र किनारी पोहोचले. धोकादायक घरांमधील लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी एका शाळेमध्ये हलवण्यात येऊ लागले. तोपर्यंत पुण्याहून ‘एनआरएफ’ची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील मदतकार्य सुरू झाले.
‘एनडीआरएफ’ने प्रथम बेपत्ता झालेल्यांची माहिती घेऊन शोधमोहीम सुरू केली. यातील एक व्यक्‍ती समुद्रातील खडकाला धरून असल्याचे दिसून आले. त्या व्यक्‍तीला समुद्र किनारी आणल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचार दिले. याच दरम्यान त्सुनामीमुळे ज्या ठिकाणी धोका वाटत होता तेथील नागरिकांपैकी गरोदर महिला, वयोवृद्ध, दिव्यांगांना एका प्राथमिक शाळेत हलवून तेथे उपचार करण्यात आले. घाबरून अस्वस्थ झालेल्यांना उपचारांसह धीर देण्यात आला. इतर सुस्थितीत असलेल्यांनाही उपलब्ध असलेल्या सुमो वाहनांमधून सुरक्षितस्थळ असलेल्या शाळेत आणण्यात आले. वाचलेल्या व्यक्‍तीसह सुरक्षित जागी आणलेल्या रहिवाशांना भोजन देण्यात आले.  शाळेत सुरक्षित स्थळी आणलेल्या ग्रामस्थांकडे ‘एनडीआरएफ’ने चौकशी केली असता आणखी दोन व्यक्‍ती बेपत्ता असल्याचे समजले. ‘एनडीआरएफ’ने त्या बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू केला.  ते दोघेही शेजारच्या गावातील समुद्र किनारी जिवंत आढळून आले. त्यांनाही सुरक्षितरित्या किनार्‍यावर आणण्यात आले. पाजपंढरीत सुरू असलेल्या मदत कार्यातील रुग्णवाहिका, अग्निशामक बंबाच्या सायरनसह इतर वाहनांच्या आवाजाने आजूबाजूची ग्रामस्थ मंडळी घटनास्थळी जमा झाली होती. तोपर्यंत संध्याकाळ झाली. संध्याकाळी 4.30 वाजता शाळेतील पाजपंढरीच्या रहिवाशांसह आजूबाजूच्या जमा झालेल्या गावकर्‍यांना त्सुनामीची आपत्ती कशी निर्माण होते याची माहिती देऊन कोणती काळजी घ्यावी, याचे ‘एनडीआरएफ’च्या टीमने मार्गदर्शन केले. तेव्हा ही त्सुनामी आपत्ती वेळची रंगीत तालीम होती हे सर्वांना समजले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास टाकला. त्याचबरोबर आपत्तीवेळी शासकीय यंत्रणा किती सतर्क आहे याचा अनुभवही उपस्थितांनी घेतला.