Sun, Mar 24, 2019 12:38होमपेज › Konkan › ब्लॉग : भक्‍कम नेटवर्क, अचूक नियोजनामुळे ‘स्वाभिमान’ला यश

ब्लॉग : भक्‍कम नेटवर्क, अचूक नियोजनामुळे ‘स्वाभिमान’ला यश

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 8:50PMकणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद आणि 17 पैकी 11 जागा जिंकून खा. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने  सिंधुदुर्ग जिल्ह्यावरील आपली पकड पुन्हा एकदा घट्ट करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे धाकटे चिरंजीव आ. नितेश राणे यांनी देवगड, वैभववाडी आणि कुडाळ न. पं. प्रमाणेच कणकवली न.पं. च्या निवडणुकीतही भक्कम नेटवर्क तसेच नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवल्यानेच  स्वाभिमानला घवघवीत यश मिळाले. खर्‍या अर्थाने या विजयाने आ. नितेश राणे हेच ‘किंगमेकर’ ठरले आहेत.  तर राणेंना टक्कर देण्यासाठी ऐनवेळी युती केलेल्या भाजप आणि शिवसेनेने एकदिलाने काम न केल्याने आणि प्रचार यंत्रणेतील ढिसाळपणा यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा पराभव विशेषतः संदेश पारकर यांच्या ‘होमपीच’वर त्यांना मोठा धक्का देणारा असून त्याच्या दुरगामी राजकीय परिणामांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. गाव विकास आघाडीचा फटका मात्र, भाजप-शिवसेनेला बसल्याचे सांगितले जाते.

ऑक्टोबर 2002 मध्ये कणकवली गावाच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले आणि 2003 साली या नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. तत्पूर्वी 10 वर्षे संदेश पारकर हे कणकवली ग्रा. पं. चे सरपंच म्हणून कार्यरत  होते. त्यामुळे कणकवली म्हणजे संदेश पारकर असेच समीकरण होते. त्यावेळी नारायण राणे यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून संदेश पारकर यांची ओळख होती. नगरपंचायत स्थापन  झाल्यानंतर 2003 साली झालेली पहिलीच निवडणूक संदेश पारकर आणि नारायण राणे या दोघांनीही प्रतिष्ठेची केली होती. या लढतीत संदेश पारकर व आ.वैभव नाईक यांनी या नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवत तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांना मोठा धक्का दिला होता.

त्यावेळी संदेश पारकर हे कणकवलीचे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र, दुसर्‍या निवडणूकीत राणे यांनी या न. पं. वर वर्चस्व प्रस्थापित करत एकहाती सत्ता घेतली. त्यामुळे संदेश पारकर यांचा  कणकवली न. पं. तील संपर्क  काहिसा कमी झाला होता. अर्थात त्यांचे धाकटे बंधू कन्हैया पारकर आणि संदेश पारकर यांच्या पत्नी सौ. समृध्दी पारकर या त्यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.दरम्यानच्या काळात राजकीय समीकरणे बदलली आणि काँग्रेसवासी झालेल्या राणेंच्या पक्षातच संदेश पारकर यांनी प्रवेश केला. त्यानंतरच्या तिसर्‍या 2013 च्या निवडणुकीत राणे आणि संदेश पारकर यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून सत्ता मिळविली होती. मात्र अडीच वर्षानंतर पुन्हा दोघांमध्ये दरी निर्माण होऊन संदेश पारकर यांनी आपली वेगळी चूल मांडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून संदेश पारकर आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष सुरू झाला. 

2018 च्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून द्यावयाचा असल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी संदेश पारकर यांनाच नगराध्यक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याचा आग्रह धरला. शिवसेना आणि भाजपने युती करून ही निवडणूक लढवावी यासाठी मुख्यमंत्र्यांनीच सूचना केल्या. खरे तर या ठिकाणी संदेश पारकर यांचे बंधू कन्हैया पारकर हेच नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक होते. मात्र, मोठ्या भावासाठी त्यांनी एक पाऊल मागे घेतले.  

मात्र, भाजप आपल्या काही जागा सोडण्यास तयार नव्हता तर सेनेने काही जागांवर आग्रही भूमिका घेतली होती. शेवटी 13 जागांवर युती झाली.  4 जागांवर मैत्रीपूण लढत देण्याचे ठरले. तेथेच युतीचे गणित चुकले. या मैत्रीपूर्ण लढतीच्या जागांवर सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची मने काही जुळली नाहीत. याचा फटका कमी-अधिक प्रमाणात दोन्ही पक्षांना या निवडणुकीत बसला. शिवसेनेतर्फे  आ. वैभव नाईक यांनी आपल्यापरीने प्रचार यंत्रणा राबविली. संदेश पारकर हे देखील प्रचारात जोमाने उतरले होते. मात्र भाजपकडून नियोजनबध्द प्रचार झाला नाही. ज्या पध्दतीने वातावरण निर्मिती करण्याची गरज होती ती झाली नाही. अनेक बुथवर कार्यकर्त्यांची वानवा दिसत होती. संदेश पारकर हे स्वतः उमेदवार असल्याने त्यांच्या नावाच्या ‘गुडवील’चा फायदा होईल, असा  विश्‍वास भाजप कार्यकर्त्यांना होता. मात्र, निवडणुकीत झालेले मतदान पाहता तो झाला नसल्याचे दिसून आले.

दस्तुरखुद्द संदेश पारकर यांनीच हा  निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. अनेक प्रभागात त्यांना कडवी झुंज द्यावी लागली. नगरसेवकपदाच्या लढतीतही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. जर मैत्रीपूर्ण लढत न होता सर्व जागांवर एकदिलाने युती झाली असती, दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी प्रभावीपणे प्रचारात उतरले असते तर याहून आणखी यश युतीला मिळाले असते, अशी चर्चा आहे. शिवसेनेतर्फे नगरसेवक सुशांत नाईक यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे चांगले मताधिक्य घेऊन त्यांनी विजय मिळविला. त्यांचे प्रभागातील नेटवर्क आणि काम त्यांना यशाकडे घेऊन गेले. तर रूपेश नार्वेकर यांनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली. शिवसेनेच्या सौ. माही परूळेकर यांचाही विजय लक्षवेधी ठरला. 

अबिद नाईक यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा न. पं. त प्रवेश

 तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांनीही स्वाभिमानशी आघाडी करण्याची तयारी दर्शवून योग्य निर्णय घेतला. शहरातील आपल्या शिलेदारांच्या साथीने आणि स्वाभिमानच्या नेटवर्कने ते चांगली मते मिळवून विजयी झाले. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचा नगरपंचायतीत प्रवेश झाला आणि बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे. 

पारकर घराणे आणि सत्ताकारण

1992 ते 2002 या दहा वषार्ंच्या काळात संदेश पारकर  हे कणकवलीचे सरपंच म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 2003 साली झालेल्या निवडणुकीत ते थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. 2008 साली झालेल्या निवडणुकीत संदेश पारकर हे स्वतः जरी नसले तरी त्यांचे बंधू आणि पत्नी नगरसेवक म्हणून कार्यरत होती. त्यानंतरच्या 2013 च्या निवडणूकीत पुन्हा संदेश पारकर यांचे बंधू कन्हैया पारकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतरच्या अडीच वर्षात ते कणकवलीचे उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यामुळे गेली 25 वर्षे सातत्याने संदेश पारकर यांचा व त्यांच्या घराण्याचा कणकवली ग्रा. पं. व न. पं. वर संपर्क होता.आता  संदेश पारकर हे पराभूत झाले असून त्यांचे बंधू कन्हैया पारकर हे देखील नगरसेवक म्हणून कार्यरत नाहीत. एकूणच कणकवली न. पं. चा मतदारांनी दिलेला निकाल हा स्वाभिमानचे बळ वाढविणारा आणि सेना-भाजप युतीला आत्मचिंतन करावा लागणारा आहे, हे निश्‍चित. 

अजित सावंत

Tags : Konkan, Successful, network, Swabhiman, success, accurate, planning