होमपेज › Konkan › अवैध वृक्षतोड करुन न्यायालयाचा अवमान करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा

अवैध वृक्षतोड करुन न्यायालयाचा अवमान करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा

Published On: Jun 29 2018 12:07AM | Last Updated: Jun 28 2018 8:56PMसावंतवाडी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील 25 गावात वृक्षतोड बंदी असताना अवैध वृक्षतोड करुन मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी शनिवार 30 जूनला उपवनसंरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना दिला आहे. 

माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीमध्ये उडेली, घारपी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असून एक-दोन वर्षात प्रचंड प्रमाणात झाडे तोडली असून उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना दिले होते. या आदेशान्वये केसरी - फणसवडे गावात एक एकरपेक्षा जास्त क्षेत्रात अवैध वृक्षतोड झाली. शिवाय उडेली व घारपी परिसरातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. मात्र, वनविभागाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण, आंदोलनाचा इशारा बरेगार यांनी दिला आहे. 

वनविभागाच्या अंतर्गत कार्यालयीन कर्मचारी बदली प्रकरणातही मोठ्या प्रमाणात तक्रारी असून आठ वर्षे झालेले वरिष्ठ कार्यालयाच्या कर्मचार्‍याला बदलीचे आदेश देऊनही त्यांना कार्यमुक्‍त केले जात नसल्याच्या निषेधार्थ बरेगार यांनी उपोषण आंदोलनाचे लेखीपत्र उपवनसंरक्षक चव्हाण यांना दिले आहे. सकाळी 10 वा. उपोषण आंदोलन केले जाणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या झालेल्याअवमान प्रकरणी जागरुक नागरिक, सेवाभावी संस्थांनी या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन बरेगार यांनी केले आहे.