Mon, Apr 22, 2019 15:38होमपेज › Konkan › विद्यार्थी पोषण आहार योजना संकटात!

विद्यार्थी पोषण आहार योजना संकटात!

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 8:55PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

गेल्या तीन महिन्यांपूर्वीपासून शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार नेमण्यास शासनाकडून चालढकल होत आहे. या कालावधीत पोषण आहार शिजवून देणार्‍या बचत गटांनी उधार ऊसनवार करुन धान्य घेत  पोषण आहार सुरू ठेवला. मात्र, आता दुकानदारांनीही संबंधितांना उधार ऊसनवारी  बंद केल्याने डिसेंबर महिन्यांपासून मुलांना पोषण आहार न देण्याचा निर्णय या बचत गटांनी घेतला आहे. शासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका आता विद्यार्थी वर्गालाही बसू लागल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. 

आघाडी सरकारच्या काळात पहिलीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळी शालेय पोषण आहार देण्याची योजना सुरू झाली. गेली काही वर्षे ही योजना सुरळीत सुरू होती. मात्र, आता शासनाच्या चालढकलपणामुळे आणि अनागोंदी कारभारामुळे ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आली आहे. या योजनेसाठी धान्य पुरवठा करण्याचे कंत्राट मार्केटिंग फेडरेशनला देण्यात आले.

मार्केटिंग फेडरेशन योजनेअंतर्गत शालेय पोषण आहाराचे धान्य पुरवठ्याचे कंत्राट जुलैमध्येच संपले. त्यावेळी धान्य पुरवठा करणारा नवीन ठेकेदार नेमणे गरजेचे होते. मात्र, जिल्हास्तरावर मार्केटिंग फेडरेशनला दोन महिन्यांच्या ठेक्याबाबत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे मार्केटिंग फेडरेशनने बचत गटांना सप्टेंबर महिन्यापर्यंत तांदुळ पुरवठा केला. तर कडधान्य शाळास्तरावर खरेदी करुन पोषण आहार सुरू ठेवण्याचे आदेश दिले गेले. आता स्थानिक स्तरावर दुकानदारांनी धान्य  उसनवारीवर देणे बंद केल्याने येत्या डिसेंबर महिन्यापासून मुलांना पोषण आहार न देण्याचा कटू निर्णय बचत गटांनी घेतला आहे.

येत्या दोन दिवसांत निर्णय अपेक्षित : मुळीक

शिक्षण विभाग माध्यमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी श्री मुळीक यांनी शालेय पोषण आहाराचा धान्य पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्यस्तरावर प्रक्रिया सुरू असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजना धान्य पुरवठा न झाल्याने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत शासन स्तरावर याबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली.