Fri, Jan 18, 2019 22:09होमपेज › Konkan › स्वतंत्र कोकण विद्यापीठ लवकरात लवकर करा 

स्वतंत्र कोकण विद्यापीठ लवकरात लवकर करा 

Published On: Feb 12 2018 1:58AM | Last Updated: Feb 11 2018 9:29PMकणकवली ः प्रतिनिधी

विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण हे महाराष्ट्राचे चार प्रमुख प्रादेशिक विभाग आहेत. इतर तीन विभागांमध्ये स्वतंत्र विद्यापीठ आहे परंतु कोकण विभागासाठी एकही विद्यापीठ नाही. हा कोकणवर उघड उघड अन्यायच नव्हे तर अत्याचार आहे.त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी येथे त्वरित विद्यापीठ करा, अशी मागणी फोंडाघाट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कणकवली तहसीलदारांना दिले. 

दोडामार्ग ते मुंबई यातील अंतर सुमारे 700 कि.मी. आहे. मुंबई विद्यापीठ कोकणच्या एका टोकाला आहे. हे विद्यापीठ मुंबई महसूल विभागात असले तरी तेथे भारतातून विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने ते भारतीय विद्यापीठ झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, प्राचार्य, प्राध्यापक, संस्था चालक या सर्वांवरच अन्याय होतो. एकेकाळी मुंबई विद्यापीठाचा दर्जा उत्‍तम होता. पण गेल्या 15 वर्षांत विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा कोसळला आहे. या सर्व बाबी पाहता कोकणला स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहे, असे विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देताना दर्शना रासम, दामिनी सावंत, वैष्णवी रेडकर, अक्षता चव्हाण, सारिका राणे, मयुरी सावंत, अभिषेक गावकर, संकेत गावकर, प्रा.जगदीश राणे, प्रा.महेंद्र नाटेकर उपस्थित होते.