होमपेज › Konkan › जिल्ह्यातील माल वाहतूकदार संपावर

जिल्ह्यातील माल वाहतूकदार संपावर

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 18 2018 9:04PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सातत्याने होणार्‍या डिझेलच्या दरवाढी विरोधात देशभरात माल वाहतूकदारांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. या संपाला जिल्ह्यातील माल वाहतूकदारांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

जिल्ह्यात सुमारे 25 हजारांहून अधिक छोटी-मोठी माल वाहतुकीची वाहने असून ही वाहतूक कोलमडणार आहे. त्यामुळे भाजी, दूध वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत सातत्याने पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांत अकरा ते बारा रूपयांनी डिझेल वाढले आहे. मात्र, माल वाहतुकीचे दर अद्याप ‘जैसे थे’च आहेत. डिझेलच्या वाढत्या दरामुळे माल वाहतुकीवर परिणाम होत आहे. चालक क्लीनरचे वेतन, गाड्यांची देखभाल दुरूस्ती, डिझेलबरोबरच सातत्याने वाढणारे ऑईलचे दर, गाड्यांचे पार्ट्स त्यामुळे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. बँकांची कर्जे घेऊन माल वाहतूक वाहने खरेदी केली जातात. मात्र, खर्चच भागत नसल्याने हप्तेही थकू लागले आहेत. त्यामुळे माल वाहतूकदारांची राष्ट्रीय संघटना माल वाहतुकीचे दर वाढविण्याच्या विचारात आहे.

दर वाढल्यास त्याचा परिणाम अन्नधान्य, भाजीपाला दरवाढीवर होणार आहे. शासनाच्या ध्येयधोरणांचा निषेध करण्यासाठी व विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राष्ट्रीय पातळीवरील माल वाहतूकदार संपात सहभागी होत आहेत. माल वाहतुकीवर हमाल संघटनाही अवलंबून आहे. त्यामुळे हातावर पोट घेऊन जगणार्‍या हमाल संघटनेच्या कामगारांवरही त्याचा परिणाम होणार आहे. 

मालवाहतूकदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने व्यावसायिकांचा विचार करायला हवा. वाहनधारकांवरील कराच्या रकमेतही आरटीओने वाढ केली आहे. त्यामुळे या संपाला पाठिंबा आहे, असे रिक्षा चालक-मालक माल वाहतूकदार संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी बोलताना सांगितले.