Tue, Sep 17, 2019 21:57होमपेज › Konkan › देवबागला उधाणाचा तडाखा

देवबागला उधाणाचा तडाखा

Published On: Jun 13 2019 1:33AM | Last Updated: Jun 13 2019 1:33AM
मालवण : वार्ताहर 

मालवण किनारपट्टीवर जोरदार वार्‍यासह खवळलेल्या समुद्री लाटांच्या तडाख्यात देवबाग गावाचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड व नुकसानीच्या घटना घडल्या. देबवाग-ख्रिश्‍चनवाडीत एका घरावर झाड कोसळून आई व मुलगा जखमी झाले. किनारपट्टी भागात वीज खांब कोसळल्याने गावात दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. 

दरम्यान, अरबी समुद्रात घोंगावणारे ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्याने सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सकाळी वारा व लाटांचा प्रभाव काहीसा कमी झाला. मात्र, सायंकाळी लाटांचा जोर वाढून पाणी पुन्हा किनारपट्टी भागात घुसले. 

देवबाग किनारपट्टी नुकसान....!

देवबाग-ख्रिश्‍चनवाडी येथे किनारपट्टी लगत असलेल्या फेलीस फर्नांडिस यांच्या शौचालयाची टाकी कोसळून नुकसान झाले. तर लीना पर्रीकर यांच्या घरावर झाड कोसळले. त्यात घराचे लाकडी वासे कोसळून लीना व त्यांचा मुलगा जखमी झाला. शालू लुद्रीक यांच्या घरात समुद्राचे पाणी घुसले. वेलांकणी मंदिरचेही काही प्रमाणात नुकसान झाले. समुद्री लाटांनी देवबाग स्मशानभूमीत गिळंकृत केली. रिचडर्ड लुद्रीक यांच्याही शौचालयाचे नुकसान झाले.देवबाग येथील आनंद परमेश्‍वर कुमठेकर यांची बोट किनार्‍यावर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली होती. मात्र, पाण्याची पातळी अधिकच वाढल्याने जोरदार लाटांच्या ताडाख्यात बोट व इंजिन तुटून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. मालवण हडी येथील अरुण साळकर यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे 73 हजार रुपयाचे नुकसान झाले.