Fri, Mar 22, 2019 02:15
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ब्लॉग: किल्ले रायगड महाराष्ट्राचं धारातीर्थ

ब्लॉग: किल्ले रायगड महाराष्ट्राचं धारातीर्थ

Published On: Feb 19 2018 10:04AM | Last Updated: Feb 19 2018 10:04AMअजित रा.जाधव (वास्तुविशारद)

किल्ले रायगड म्हणजे महाराष्ट्राचं धारातीर्थ! स्वातंत्र्यसूर्याची कोवळी किरणं महाराष्ट्रातील शेकडो किल्ल्यांनी पाहिली; पण स्वराज्याचा पूर्ण यशोचंद्र आपली शीतल किरणं घेऊन बरसला तो रायगडाच्या पावन भूमीवरच! किल्ले रायगड म्हणजे गडांचा राजा! शेकडो वर्षांच्या आपल्या स्वराज्याच्या अतृप्त इच्छा मराठ्यांनी, भारतीयांनी मूर्त झालेल्या पाहिल्या त्या याच गडावर. स्वातंत्र्य आले, स्वराज्य आले हे दशदिशांना ओरडून सांगणार्‍या तोफा धडाडल्या त्या रायगडाच्याच बुरुजांवरून. रायगडच्या पवित्र भूमीवरच महाराज छत्रपती झाले. स्वातंत्र्य लक्ष्मीच्या अलौकिक सोहळ्याने सार्वभौम नृपती झाले. वर्षानुवर्षे यवनी अंमलाखाली राहिलेल्या रायगडाच्या ऊरी-पोटी स्वतंत्र सिंहासनाचं, स्वराज्याचं स्वप्न रंगविलं असेल आणि स्वप्नाची मूर्त पूर्तता, सत्यता पाहून चिरेबंदी पाषाणाचा रायगडही गहिवरला असेल. गड-कोटांशिवाय जे राज्य असते त्या राज्याची सुरक्षितता कायम धोक्यात असते. गड-कोट हेच राज्य, राज्याचे मूळ. दुर्ग म्हणजे खजिना, सैन्याचे बळ, सुरक्षित वसतीस्थाने असलेली प्राणसंरक्षण प्रणाली. गड-कोट म्हणजे राज्यलक्ष्मी. म्हणून कोणाच्याही भरवशावर न राहता गड-कोटांचे संरक्षण करावे व नवनवीन किल्ले बांधण्याचा हव्यास करावा, अशी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. निसर्गत:च रायगड अत्यंत दुर्गम आहे. गडाचा प्रचंड परिसर, चहुबाजूंनी तुटलेले आणि भोवळ आणणारे अक्राळ-विक्राळ कडे, चढताना ऊर फुटून जाईल असा खडा चढ. भोवताली घनदाट जंगल, सगळा मुलूख डोंगराळ. डोंगरी किल्ल्यांना दुर्ग का म्हणतात, ते किल्ले रायगड पाहिल्याविना समजणं अवघड. रायगडाचं आधीचं नाव होतं रायरी किंवा राजगिरी म्हणजे राजाचा डोंगर. त्याला सार्थकता आणली शिवरायांनी. एक पुण्यवंत राजा रायरी जिंकून आला. राजांनी गडाला आणि गडाने राजांना पाहिले. रायगडापासून सागरकिनाराही अगदी जवळ. त्यामुळे जंजिर्‍याच्या सिद्धीवर जरब बसविण्यासाठी रायगड मोक्याचा होता. रायरी अभेद्य आहे, हे महाराजांच्या गरुड दृष्टीनं हेरलं आणि शिवरायांनी गडाचं नामकरण केलं- रायगड! 

‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा. परंतु, उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा.’ असे सभासद बखरीमध्ये शिवरायांनी हिरोजीला सांगितल्याचा उल्लेख आहे. शतकानुशतके उपेक्षित राहिलेला हा दुर्गम दुर्ग राज्याभिषेकाच्या विचारानेच मोहरला असेल. महाराजांची आज्ञा ऐकून हिरोजी कामाला लागला. मराठ्यांच्या छत्रपतींना साजेशी राजधानी असावी, असे वाटल्याने हिरोजीने अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. भारतातील तत्कालीन राजांचे राजवाडे, गडांची रचना, इतर इमारती, बारूदखाना व संरक्षण व्यवस्था यात जे काही उपयुक्त आहे, शाश्‍वत आहे ते सर्व रायगडावर हवे. त्यांची एक विस्तृत यादी तयार केली गेली. त्यानुसार रायगडाचं बांधकाम सुरू झाल्यावर गडावर काय, कुठे, कसं, किती बांधलं पाहिजे? याचा एक नकाशा तयार केला गेला. शिवाजी महाराजांकडून प्रारंभ प्रमाणपत्र घेऊन त्यानुसार निधी आणि कालावधीचे नियोजन करण्यात आले व त्याबरहुकूम पूर्णही करण्यात आले. 

राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी महाराजांची महती, प्रशस्ती सांगणारा दर्शनी भागावर दृश्य ठिकाणी लावण्यासाठी एक संस्कृत शिलालेख तयार करण्यात आला. कालांतराने इंग्रजांच्या राज्यात तो शिलालेख काढून टाकला असणार. बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्‍वराचे मंदिर! मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे; पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की, भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी मोठे कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस शेंदूर फासलेली हनुमंताची मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर समोर शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तप्तर हिरोजी इटळकर.’ मंदिराच्या तिन्ही बाजूला मोकळा असलेला भाग कमानी करून पुनर्निर्माण (रिकन्स्ट्रक्शन) मध्ये बुजविला गेला. कारण, यामध्ये एकसंध दगड वापरलेला नसून, वेगवेगळ्या आकाराचे दगड वापरले आहेत. मंदिराची तटबंदी ही नंतरच्या काळात बांधली गेली असावी. कारण, मंदिराचे दगड आणि तटबंधीला वापरण्यात आलेले दगड, त्यांचा आकार, बसविण्याची पद्धतही वेगळी आहे. कमानीमध्ये उजव्या बाजूला तिरकस बसविलेला सुंदर शिलालेख दिसतो. जर तो मूळ बांधकामात असता तर लाईन, लेवल, ओळंबा वापरून शून्य अंश कोनात सहज पोहोचून वाचता येईल, असा बसविला असता. मंदिराच्या बाहेरील दक्षिणेकडील भिंतीवर एक शरभाचं शिल्प लावलेलं आहे. तेही तिरकं आहे. मंदिराची डागडुजी करण्यासाठी तत्कालीन लोकांनी उपलब्ध दगडांचा, शिल्पांचा वापर केलेला दिसतो. 

एका प्रकाशित पेशवेकालीन कागदामध्ये वाडेश्‍वर मंदिराचा 1773 साली जीर्णोद्धार झाल्याचा उल्लेख आहे. असेच शरभाचे शिल्प नगारखान्यावर मात्र सरळ रेषेत लावलेलं आहे. तो शिलालेख पुढीलप्रमाणे- श्री गणपतये नम:। प्रासादो जगदीश्‍वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपते: शिवस्यनृपते: सिंहासने तिष्ठत:। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लशसापै तिथौ ॥1॥ वापीकूपडागराजिरूचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभे: कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते। श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ  लसतस्तावत्समुज्जृंभते ॥2॥ याचा अर्थ पुढीलप्रमाणे- विघ्नहर्त्या गणेशाला वंदन असो. तिन्ही लोकांत आनंद देणारा हा जगदीश्‍वराचा प्रासाद (एक जगदीश्‍वर जो शिवाच्या रूपाने मंदिरात विराजमान आहे आणि दुसरा जगदीश्‍वर शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेच्या हृदयावर विराजमान आहे.) सिंहासनाधीश्‍वर शिवाजी महाराजांच्या आज्ञेने शके 1596 आनंद नाम संवत्सरे शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला, आश्‍लेषा नक्षत्र आकाशात उदीत होत असताना ज्योतिषशास्त्रात कीर्तिमान मानलेल्या तिथी, वार, नक्षत्र, करण, योग अशा पंचांगातील सर्वोच्च मुहूर्तावर ज्याच्याभोवती मनोरे, गजशाळा, विहिरी, तलाव, वने, बागा, स्तंभ निर्माण केले आहेत. 

माणसांमध्ये जो देवराजसमान असतो नर-इंद्र म्हणतात, असे नरेंद्रसदन म्हणजे महाराजांचा उंच आणि देखणा राजवाडा व इतर दुय्यम इमारती बांधल्या गेल्या. असा तो वाणीला अवर्ण्य अशा रायगडावर सर्व जमिनीवरील आणि जमिनीखालील बांधकामे हिरोजी नावाच्या शिल्पकाराने निर्माण केली आहेत. श्रीमद्रायगिरौ वरील सर्व गोष्टी यावच्चन्द्रदिवाकरौ म्हणजे जोपर्यंत अवकाशात चंद्र, सूर्य, तारे आहेत, तोपर्यंत या जगदीश्‍वराची म्हणजे गड बांधण्यासाठी माझी नेमणूक करणार्‍या शिवाजी महाराजांची कीर्ती पृथ्वीवर अपरंपार नांदो! जगदीश्‍वर या शब्दाचा संधी विग्रह जगत्+ईश्‍वर असा आहे. जो समस्त जगाचा ईश्‍वर पालनकर्ता आहे. राजा हा देवाचा अंश असतो म्हणून तो जगदीश्‍वर या नावाने ओळखला जातो. हा शिलालेख महाराजांच्या काळात लिहिलेला व योग्य स्थापिलेला होता. रायगडचा वास्तुशिल्पी (आर्किटेक्ट अँड इंजिनिअर)हिरोजी इटळकरने दिलेले लेखी अंतिम भोगवटा प्रमाणपत्र (कंप्लिशन सर्टिफिकेट) म्हणजे हा शिलालेख आहे. आता यजमान म्हणजेच अन्नदाता जगदीश्‍वर वास्तुपुरुषाच्या कृपेने इमारतीचा भोगवटा सुखेनैव घेऊ शकतात. इंदूलकरांनी शंकराच्या रूपात शिवाजी महाराजांना पाहिले आणि त्यांना देवाचा मान देऊन जगदीश्‍वर या सन्मानदर्शक उपाधीने संबोधले.

प्रासादाचे प्रकार कोणते?

प्रासादानां जात्युद्देश:। प्रासादाकार पूजाभिर्देवदैत्याभि:क्रमात। चतुर्दश समुत्पन्ना: प्रासादानां च जातय:। (प्रासादमण्डनम् प्रथमोऽ ध्याय:। श्‍लोक 6) प्रासादांच्या जातींचे, निरनिराळे प्रकार होण्याचे कारण- प्रासादांच्या, त्यांच्या आकारानुसार, देव, दैत्य इत्यादींना अनुसरून, तसेच त्याच्यात केल्या जाणार्‍या पूजांना अनुसरून अनुक्रमे चौदा जाती निर्माण झाल्या आहेत. अपराजित पृच्छात (106.11-16) मध्ये प्रासादांच्या चौदा जातींबद्दल जास्त माहिती दिली आहे. 1) नागर प्रासाद देवांचा असतो, 2) द्राविड प्रासाद श्रेष्ठ दानवांचा, 3) लतिन प्रासाद गंधर्वांचा, 4) विमान प्रासाद यक्षांचा, विद्याधरांचा असतो, 5) मिश्रक प्रासाद वसूंचा, 6) वराटक प्रासाद, तसेच नागदेवतांचा सांधार प्रासाद व नरेंद्रांचा, 7) भूमिज प्रासाद असतो सूर्यलोकात, 9) विमाननागरच्छंद व नक्षत्रांचा मुख्य म्हणजे चंद्रलोकांत, 10) विमान पुष्पक जातीचे प्रासाद तयार झाले पार्वतीपासून, 11) वलभी आकाराचा प्रासाद व हरसिद्धी इत्यादी देवतांपासून, 12) सिंहावलोकन प्रासाद तयार झालेत व्यंतर स्थानी असलेल्या देवांपासून, 13) फांसनाकार प्रासाद व इंद्रलोकांत निरनिराळे, 14) रथ (रथारूढ) प्रासाद तयार झाले. प्रासादमिश्रकाश्‍चैवमष्टौ जातिषु चोत्तमा:। सर्वदेवेषु कर्तव्य: शिवस्यापि विशेषत:। (प्रासादमण्डनम् प्रथमोऽध्याय:। श्‍लोक 8) तसेच मिश्रक प्रासाद अशा प्रासादांच्या आठ उत्तम जाती आहेत. हे प्रासाद देवांसाठी व त्यातल्या त्यात विशेषत: शंकराच्या देवालयासाठी योग्य आहेत. नागर जातीचे प्रासाद गुजरात, सौराष्ट्र, माळवा इत्यादी प्रदेशात प्रामुख्याने आहेत. वेण्णा नदीच्या खाली कृष्णाकुमारीपर्यंत द्राविड प्रासादांचे प्राबल्य आहे. लतिन प्रासाद विदर्भ व मध्य प्रदेशात प्रचलित आहेत, तर विमान प्रासाद ओडिशा राज्यात बांधले जातात. अशारीतीने प्रासादांच्या निरनिराळ्या जाती या देशपरत्वे निर्माण झाल्या आहेत. वापी-कूप-तडागानि प्रासादभवनानि च। जीर्णान्युद्धरते यस्तु पुण्यमष्टगुणं लभेत्। (प्रासादमण्डनम् अष्टमोऽध्याय:। श्‍लोक 6) लहान व मोठ्या विहिरी, तलाव, प्रासाद (देव मंदिर), तसेच भवन (सभाभवन, राजभवन इत्यादी) यांचा जीर्णोद्धार करणार्‍याला (नवीन वास्तू बांधली असता मिळणार्‍या पुण्याच्या)आठपठ अधिक पुण्य मिळते.

गडावर राजमंदिराशिवाय मोठ्या इमारतीचे घर बांधले जाऊ नये. राजमंदिरदेखील विटांनी बांधून त्यामध्ये चुना भरावा. गडावरील मार्गांवर, तटबंदीवर केरकचरा पडू न द्यावा. झालेला केरकचरा गडाखाली न टाकता जागोजागी जाळून ती राख नंतर परसात टाकून त्यावर भाजीपाला पिकवावा. गडाच्या तटबंदीवर झाडे वाढतात. ती वरचेवर कापून काढावीत. तटावरील व तटाखालील गवत जाळून गड न्हाणावा, स्वच्छ करावा. गडावरील काही झाडे मुद्दाम राखावीत. फणस, चिंच, वड, पिंपळ इत्यादी मोठे वृक्ष, तसेच लिंब, नारिंग इत्यादीसारखे लहान वृक्ष आणि फूलझाडे गडावर लावावीत व ती जतन करावीत. या झाडांची लाकडे उपयोगास येऊ शकतात. रायगडावर शिवरायांचा रत्नखचित महाल शोभत आहे.

किल्ला इतका विशाल आहे की, त्यात तिन्ही लोकीचे वैभव साठविलेले आहे. किल्ल्याखालील भूभाग जलमय पातळीसारखा, माची म्हणजे पायथ्याच्या उंचवठ्याचा भाग पृथ्वीप्रमाणे आणि वरील भाग इंद्रपुरीप्रमाणे शोभतो. अमृताप्रमाणे मधूर आणि रसाळ फळे देणारे आम्रवृक्ष आहेत. वसंतादि सहाही ऋतू येथे सुवासिक फलफुलादी सामग्रीसह नेहमी राहतात. चारही दिशांना चंपा, चमेली, चंदन, रायआवळा, लवंगा, केळी यांची झाडे व वेली आहेत. असा हा सुखदायी राजदुर्ग महाराजांच्या निवासस्थानामुळे शोभू लागला. स्वातंत्र्य आणि स्वराज्याच्या या महन्मंगल जगदीश्‍वर मूर्तरूपाला हा विनम्र मुजरा!!