Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग समुद्रात वादळसदृश स्थिती

सिंधुदुर्ग समुद्रात वादळसदृश स्थिती

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 10:12PM

बुकमार्क करा

मालवण / देवगड : प्रतिनिधी

केरळ तामिळनाडूला तडाखा देऊन लक्षद्वीपच्या दिशेने पुढे सरकलेल्या चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. शनिवारी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दक्षिणेकडील वादळामुळे सिंधुदुर्ग समुद्रात थांबलेल्या केरळ, तामिळनाडूतील मच्छीमारी नौकानी मालवण व देवगड बंदरात आसरा घेतला आहे. 

शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण होते तर वेधशाळेने 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा दिल्यानंतर बंदर विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मालवण पोलिसांच्या सागरी गस्त पथकाने परराज्यातील बोटींवर जाऊन पाहणी करत कागदपत्रांची माहिती घेतली व वादळ शमत नाही तोपर्यंत बंदर सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. 

केरळ तामिळनाडू किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळाने तडाखा दिला. त्यानंतर हे चक्रीवादळ लक्षद्वीप बेटाच्या दिशेने आत सरकल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि पोलिस तसेच वेधशाळेने दिलेल्या सूचनेमुळे सिंधुदुर्ग समुद्रातील  दक्षिणेकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या बोटी पुन्हा मालवण आणि देवगड बंदरात विसावल्या. मालवणचे सागरी पोलिस गस्तीचे प्रमुख अनिल साठे व त्यांच्या सहकार्‍यांनी बोटींवर जाऊन त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे. जोपर्यंत वादळ शमत नाही तोपर्यंत बंदर सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच या बोटींवरील मच्छीमारांना मालवण पोलिस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. 

सध्या समुद्रात 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहेत. समुद्रात चार फूट उंचीच्या लाटा उसळतील, असे हवामान खात्याने कळविले आहे. तर मच्छीमार, होडी व्यावसायिक व वॉटरस्पोर्ट व्यावसायिक यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून बंदर विभागाला प्राप्त झाल्या आहेत. तर धोक्याची सूचना म्हणून बंदरात दोन नंबरचा बावटा लावण्याचा आदेशही प्राप्त झाला आहे. मालवण बंदरातील मोडलेल्या बावट्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यावर बंदरात दोन नंबरचा बावटा लावण्यात येईल, अशी माहिती बंदर निरीक्षक सौ. कुमठेकर यांनी दिली आहे.

चक्रीवादळामुळे समुद्रात भरकटलेल्या तामिळनाडू, केरळ येथील नौकांनी सुरक्षेसाठी देवगड बंदराचा आश्रय घेतला आहे. यामध्ये सुमारे 100 नौकांचा समावेश आहे. यामुळे देवगड बंदर नौकांनी गजबजले आहे. ओखी वादळाचा तडाखा दक्षिण भारताला बसला असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.