Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Konkan › चिपळूणला वादळाचा तडाखा

चिपळूणला वादळाचा तडाखा

Published On: Apr 17 2018 10:41PM | Last Updated: Apr 17 2018 10:21PMचिपळूण : शहर वार्ताहर

चिपळूण परिसरात मंगळवारी दुपारी 3.45  वा. च्या सुमारास वादळाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. चक्रीवादळाबरोबरच पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. परिणामी, गेले चार दिवस असहाय्य उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. या वादळात अनेक बहुमजली इमारतींवरील, शेडवरील पत्र्यांचे नुकसान झाले तर भोगाळे परिसरातील रस्त्यावरील टपर्‍या उद्ध्वस्त झाल्या.

गेले पाच-सहा दिवस हवेमध्ये प्रचंड उष्मा वाढला होता. असहाय्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. वार्‍याच्या झोताबरोबर उष्ण हवेमुळे शरीराची लाहीलाही होत होती. अशा वातावरणात गेले पाच-सहा दिवस पाऊस येण्याची लक्षणे आहेत, अशी चर्चा नागरिक करीत होते. अशातच मंगळवारी सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहराच्या पूर्व भागासह खडपोली, अलोरे, शिरगाव, पोफळी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. 

अवघ्या पंधरा मिनिटांतच पूर्व भागातील हा पाऊस वादळाच्या रूपात शहराकडे सरकला. पावणेचार वाजण्याच्या सुमारास शहरात चक्रीवादळाला अचानक  सुरुवात झाली. यामुळे भोगाळे, पवन तलाव मैदान परिसरातील मैदानावरील धुळीचे लोट संपूर्ण शहरभर पसरले. शिवाजी चौक ते बसस्थानक परिसरात धुळीने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. महामंडळाच्या बसेसही वादळाच्या तडाख्यात सापडल्या. वादळादरम्यान या मार्गावरून जाणार्‍या वाहनचालक व बसचालकांनी आपापली वाहने रस्त्याच्या मधोमधच उभी केली.  वादळाचा जोर कमी होताच प्रत्येक वाहनचालक वेगाने सुरक्षित स्थळी थांबले. 

दरम्यान, भोगाळे परिसरातील रस्त्यानजीक असलेल्या अनधिकृत टपर्‍या या वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. अनेक टपर्‍या रस्त्याच्या मधोमध पडल्या. परिणामी, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. वादळाच्या प्रचंड वेगापुढे शहरातील बहुमजली इमारतीवरील शेडच्या पत्र्यांचे नुकसान झाले. वादळाच्या घोंघावाबरोबर पत्र्यांचा आवाज त्यातच पावसाची हजेरी, विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट अशा परिस्थितीत कामानिमित्त बाजारपेठ व अन्य ठिकाणी आलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सुमारे अर्धा तास पावसाच्या सरींनी गेल्या पाच-सहा दिवसांतील असहाय्य उकाड्यावर फुंकर घातली. 

तालुक्यातील रामपूर, मार्गताम्हाने, सावर्डे परिसरातही पाऊस झाला. वादळी वार्‍यामुळे चिपळुणात अनेक ठिकाणी शेडवरील पत्रे उडून नुकसान झाले. शहरातील बंद अवस्थेत असलेल्या मात्र, नव्याने शेड बांधलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र व डॉ. बाळासाहेब सावंत स्टेडियमवरील वरील पत्र्याची शेड वार्‍याने उडाली. अनेक पत्रे उडून गेले. यामुळे नुकसान झाले आहे. डॉ. रीळकर रुग्णालयासमोर असलेल्या रिक्षा गॅरेजवर झाड कोसळून नुकसान झाले. चिपळुणात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. खेडमध्ये किरकोळ पाऊस झाला, तर गुहागर, दापोली, मंडणगडमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत या भागात पाऊस झाला नाही.

वादळाची अतिक्रमण हटाव मोहीम...
दोन महिन्यांपूर्वी चिपळूण नगर परिषदेने भोगाळे परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांविरोधात कारवाई केली. त्यानंतर पुन्हा एकदा या व्यावसायिकांनी बस्तान मांडले. यानंतर पुन्हा कारवाई करू, असे न.प.ने इशारा दिला. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही. अखेर मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍यात ही अतिक्रमणे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे निसर्गानेच अतिक्रमण हटाव मोहीम राबवली, अशी चर्चा सुरू होती.