Mon, Jul 22, 2019 04:42होमपेज › Konkan › चौपदरीकरणाचे काम रोखले!

चौपदरीकरणाचे काम रोखले!

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 11:38PMकुडाळ : शहर वार्ताहर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाचा प्लॅन दाखवण्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून टाळाटाळ होत आहे. पावसाळ्यात पावशीत निर्माण होणार्‍या पूरस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना पदाधिकारी व पावशी  ग्रामस्थांनी कुडाळ-भंगसाळ नदीवरील ब्रीजसह पावशीतील महामार्गाचे काम गुरुवारी बंद पाडले. जोपर्यंत प्लॅन दाखवला जात नाही, तसेच पावशीवासीयांच्या हिताच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम करू देणार नाही, वेळप्रसंगी प्रकल्पग्रस्तांसह रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा पावशीचे सरपंच भिकाजी (बाळा) कोरगावकर यांनी ठेकेदारासह प्रशासनाला यावेळी दिला. आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या दालनात ग्रामस्थांशी चर्चा झाली; परंतु यामध्ये समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

पावशी गावातून जाणार्‍या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या महामार्गाच्या बाजूला लोकवस्ती, भातशेती असून लोकांची ये-जा, गुरेढोरे यांच्यासाठी पर्यायी काय व्यवस्था आहे, तसेच बेलनदी ते घावनळे फाटा दरम्यान दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन महामार्ग ठप्प होतो. नवीन महामार्गाची उंची सुमारे 23 फुटांनी वाढणार आहे. पुराचे पाणी वाहण्यास  कोणती व्यवस्था केली आहे, याबाबत महामार्ग विभागाकडे माहिती मागूनही ती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांसह सेना पदाधिकार्‍यांनी भंगसाळ नदीवरील ब्रीजसह महामार्गाच्या कामावर धडक देत काम बंद पाडले. 

महामार्गाचा प्लॅन दाखवावा, गावात सर्व्हिस रस्ते, बॉक्सवेल, अंडरपास शाळांना पर्यायी रस्ते तसेच पावसाळ्यात पूरस्थितीमुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पाणी वाहण्याची व्यवस्था आदी पावशीवासीयांच्या मागण्या मान्य व्हाव्यात अन्यथा कोणत्याही परिस्थितीत काम करू देणार नसल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला. दरम्यान आ. वैभव  नाईक यांना पदाधिकार्‍यांनी माहिती दिली असता त्यांनी तातडीने याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी सर्वांना बोलावून घेतले.

कुडाळचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुधीर शिंदे सहकार्‍यांसह घटनास्थळी  दाखल झाले असता शिवसेना पदाधिकार्‍यांनी त्यांचेही वाहतूक व कामाबाबत  लक्ष वेधले. तसेच महामार्गावरून ठेकेदार कंपनीच्या ताडपत्री न घालता धावणार्‍या  डंपरवर कारवाई करावी. तसेच रात्रीच्या वेळी काम करू नये अशा मागणीचे निवेदन दिले. शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, सभापती  राजन जाधव, जि.प. सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, सरपंच भिकाजी (बाळा) कोरगांवकर, उपसरपंच दीपक आंगणे, संजय भोगटे, उदय वाटवे, प्रशांत खोचरे, रवी तुळकर, लक्ष्मीकांत तेली, संजय केसरकर, रूपेश  शेलटे, तुळशीदास तेली, अरूण शेलटे, संदीप शेलटे, सागर भोगटे, प्रमोद भोगटे, सागर तुळसकर आदींसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.