Sun, Aug 25, 2019 08:10होमपेज › Konkan › रेल्वे मार्गाचे काम बंदच

रेल्वे मार्गाचे काम बंदच

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 10:01PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे काम करताना येथील ग्रामस्थांच्या मागण्यांकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या देऊड-चिंचवाडी ग्रामस्थांनी रविवारी दुसर्‍या दिवशीही या मार्गाचे काम रोखले. जोपर्यंत अधिकारी येऊन अंतिम तोडगा काढत नाहीत तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा निर्धार येथील ग्रामस्थांनी केला आहे.

हा मार्ग करताना येथील ग्रामस्थांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. येथील ग्रामस्थांची नदीवर जाण्याची वाट बंद झाली असून, लाबंचा पल्‍ला गाठून ग्रामस्थांना पाणी  आणावे लागत आहे. रेल्वे मार्गावरील काढून टाकण्यात येणारी माती व दगड येथे ग्रामस्थांच्या जमिनीत टाकून दिल्याने कलमे मोडून पडली आहेत. मागील अनेक पिढ्यांपासून येथील ग्रामस्थांचे गावात वास्तव्य आहे. या जागेत नियमितपणे त्यांची वहिवाटही आहे. मात्र, या जागेच्या सातबार्‍यावर त्यांचे नाव नाही. याचा फायदा या प्रकल्प अधिकार्‍यांनी घेतला आहे. दलालांना हाताशी धरून जमिनीचे व्यवहार ग्रामस्थांना कोणतीही सूचना न देता करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्‍त झाले असून, अधिकार्‍यांनी आपल्याला अंधारात ठेवल्याची भावना 

त्यांच्यामध्ये आहे. या ग्रामस्थांना कोणत्याही स्वरुपाची नुकसान भरपाई दिलेली नाही, त्यातच भूसुरुंगाच्या स्फोटामुळे घरांना तडे गेल्याने या ग्रामस्थांच्या संतापाचा शनिवारी उद्रेक झाला. 

जोपर्यंत अधिकारी येऊन आपल्या विविध मागण्यांबाबत अंतिम तोडगा काढत नाहीत तोपर्यंत या रेल्वेमार्गाचे काम करू देणार नाही, असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. महसूल खात्याने सातबार्‍यावरील घरे, गोठा यांच्या नोंदी अचानक कोर्‍या केल्यामुळे आम्हा गरिबांना कोणी वालीच उरला नसल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या वाडीतील महिला, पुरूष, मुले सर्वजण या बोगद्याजवळ येऊन बसले असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.