होमपेज › Konkan ›  पावसामुळे महामार्ग ठप्प, जगबुडी पुलावरील वाहतूक बंद

रत्‍नागिरी : जगबुडी नदीला पूर, वाहतूक बंद

Published On: Jul 05 2018 8:59PM | Last Updated: Jul 05 2018 8:59PMखेड (जि. रत्‍नागिरी): प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे खेडमधील नारिंगी आणि जगबुडी पुलावरुन पाणी गेल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. जगबुडीच्या पाण्याची पातळी आठ मीटरच्यावर गेल्याने पुलावरुन गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाणी वाहत होते. दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.  

एकीकडे रायगडमध्ये दासगावमध्ये दरड कोसळून महामार्ग सुमारे सात तास ठप्प होता. त्यात आता भर म्हणून जगबुडी पूल वाहतुकीस बंद केल्याने महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली. गुरुवारी सायंकाळी 4.30 पासून पावसाचा जोर वाढल्याने खेड पोलिसांकडून जगबुडी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. सुरुवातीला एक-एक वाहन सोडण्यात येत होते. मात्र, त्यानंतर पाणी वाढल्याने पूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

पावसाच्या संततधारेमुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने एसटी बसच्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरात कामासाठी आलेल्या ग्रामीण भागातील रहिवाशांना परतीच्या प्रवासात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. शहरातील मटण-मच्छी मार्केट परिसरात पाणी शिरले असून जगबुडी किनार्‍यावरून बंदर भागाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. नारिंगी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी परिसरातील शेकडो एकर भातशेतीमध्ये शिरले आहे. शहरातील काही शाळांना अतिवृष्टीमुळे सुट्टी देण्यात आली असून प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

खेड तालुक्यात गेल्या दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे जगबुडी, नारिंगी, चोरद आदींसह सर्वच लहान मोठ्या नद्यांना पूर आला आहे. मुसळधार कोसळणार्‍या पावसाने मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी माती रस्त्यावर आली आहे तर महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य आहे. कशेडी घाटातील आंबा स्टॉप नजीक अवघड वळणावर बुधवार दि.4 रोजी सायंकाळच्या सुमारास एक कंटेनर रस्त्याच्या नजीक उलटला असून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. धामणदेवी नजीक अवघड वळणावर एक मालवाहू ट्रक निसरड्या रस्त्यावरून उलटला. या अपघातात देखील एकजण किरकोळ जखमी झाला आहे.