Sun, May 26, 2019 16:41होमपेज › Konkan › हळवल-वागदे ग्रामस्थांचा रास्ता रोको

हळवल-वागदे ग्रामस्थांचा रास्ता रोको

Published On: Aug 17 2018 10:34PM | Last Updated: Aug 17 2018 10:03PMकणकवली : प्रतिनिधी 

मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असतानाच या पुलावरील पाणी वाहून जाण्यासाठी ठेवलेले छोटे होल बुजल्याने सातत्याने पुलावर पाणी साचून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या खड्डे आणि साचलेल्या पाण्याचा त्रास या पुलावरून ये-जा करणारे पादचारी आणि वाहनचालकांना होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातत्याने महामार्ग प्राधिकरणचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शुक्रवारी सकाळी 10 वा. अचानक हळवल-वागदे ग्रामस्थांनी गडनदी पुलावर महामार्ग रोखला. यामुळे संबंधित यंत्रणेची तारांबळ उडाली. अखेर पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत तोडगा काढला. येत्या 24 तासांत पुलावरील मार्ग सुस्थितीत केला जाईल, अशी ग्वाही संबंधित महामार्ग प्राधिकरणच्या यंत्रणेने दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

या आंदोलनात हळवल माजी सरपंच शशिकांत राणे,पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजू राणे, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, सुदर्शन राणे आदींसह हळवल-शिरवल, वागदे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

गेले दोन महिने गडनदी पुलावर खड्डे पडले आहेत. या खंड्यामध्ये पाणी साचत असल्याने हळवल,वागदे या गावातील पादचार्‍यांना  ये-जा करताना मोठ्या अडचणी निर्माण होतात.अचानक रास्ता रोको केल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या़  काही काळ महामार्ग ग्रामस्थांनी रोखून धरला.शेवटी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़. त्याचबरोबर महामार्ग ठेकेदार व अधिकारी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले़ यावेळी ठेकेदाराने या रस्त्यावर सीमेंट काँक्रीटने खड्डे बुुजवून वाहतुकीस योग्य रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन दिले़.  

यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी आंदोलन थांबवा, योग्य असा रस्ता आपल्याला बनवून देण्याची जबाबदारी मी घेतो, अशी यशस्वी शिष्टाई केली.मात्र येत्या दोन दिवसात पादचारी व वाहनांसाठी  हा रस्ता सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस़ ए.ओटवणेकर, जयश्री पाटील, वाहतूक पोलिस प्रकाश गवस, गुरुनाथ नाईक आदी घटनास्थळी दाख झाले होते.