होमपेज › Konkan › हातखंबा येथे महामार्ग रोको

हातखंबा येथे महामार्ग रोको

Published On: Aug 03 2018 10:40PM | Last Updated: Aug 03 2018 10:07PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहरामध्ये मराठा आंदोलन यशस्वी झाल्यानंतर माजी खा. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हातखंबा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 रोखण्यात आला. सुमारे तासभर महामार्ग ठप्प झाला होता. खासगी वाहनेही आंदोलकांचे लक्ष्य होऊ नयेत, यासाठी ती आंदोलन स्थळापासून 2 कि.मी. अंतरावर थांबविण्यात आली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्यासाठी माजी खा. नीलेश राणे यांनी तरुण मराठ्यांसह हातखंबा येथे धाव घेतली. महामार्गावर स्वत: ठिय्या मांडत त्यांनी रास्ता रोकोला सुरुवात केली. त्यानंतर मराठा तरुण दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन हातखंबा तिठा येथे दाखल झाले. पंधरा मिनिटांत सुमारे पाचशे ते सहाशे मराठा तरुणांनी मुंबई-गोवा महामार्गासह रत्नागिरीकडे येणारे रस्ते गाड्या आडव्या लावून बंद करण्यात आले. मराठा तरुणांच्या सोबतीला महिलावर्गही खांद्याला खांदा लावून सहभागी झाले. रास्ता रोकोवेळी तोडफोड होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणेने वाहतूक मदत केंद्र व निवळी परिसरातच खासगी वाहने थांबवून ठेवली होती. माजी खा. राणे यांच्यासह मुन्‍ना देसाई, राकेश साळवी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, डीवायएसपी गणेश इंगळे, पो.नि. सुरेश कदम, शिरीष सासने, विनीत चौधरी, अनिल विभुते, शिवाजी मुळीक यांच्यासह राज्य राखीव पोलिस दलाचे जवान, जिल्हा पोलिस, सिंधुदुर्ग पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते.