Fri, Apr 19, 2019 13:55होमपेज › Konkan › भात बियाणे खरेदीला आचारसंहितांचा ब्रेक!

भात बियाणे खरेदीला आचारसंहितांचा ब्रेक!

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 10:16PMसिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

स्थानिक विधान परिषद आणि त्या पाटोपाठ आता पदवीधर मतदारसंघ निवडणूक अशा दोन आचारसंहिता लागल्याने भात बियाणे खरेदी प्रक्रिया थांबली आहे. यामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणार्‍या या भात बियाणांना मुकावे लागणार असल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मात्र धास्तावले आहेत.

दरवर्षी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी भात बियाणी खरेदी केली जातात. ही बियाणी शेतकर्‍यांना 75 टक्के अनुदानावर पुरविली जातात. यावर्षी मात्र या भात बियाणी खरेदीलाच आचारसंहितेमुळे ब्रेक लागल्याने ती होऊ शकली नाही. सहाजिकच जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आता शेतात काय पेरायचे? असा सवाल त्याच्यासमोर उपस्थित झाला आहे.

राज्यात यावेळी 22 एप्रिलपासून विधानपरिषद कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागली. या निवडणुकीसाठी 21 मे रोजी मतदान होऊन त्यानंतर 24 मे रोजी  मतमोजणी झाली. 

ही आचारसंहिता 25 मे रोजी संपणार होती. मात्र तोपर्यंत 25 मे पासूनच पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक जाहीर होऊन राज्यात या निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागली. या पदवीधर मतदारसंघासाठी 25 जून रोजी मतदान होणार असून ही आचारसंहिता 29 जून रोजी संपणार आहे. या लागोपाठ दोन निवडणुकांसाठी लागलेल्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कृषी विभागाची भात बियाणे खरेदी प्रक्रिया रखडली आहे. 

 ही आचारसंहिता संपायला 29 जून उजाडणार असल्याने तोपर्यंत जिल्ह्यातील शेतकर्‍यांची पेरणीची कामे संपलेली असणार आहेत. त्यामुळे या नंतर खरेदी केलेल्या भात बियाणांचा येथील शेतकर्‍यांना कोणताच उपयोग होणार नाही. जिल्ह्यातील शेतकरी प्रतिवर्षाप्रमाणे जि. प. कृषी विभागकडून आपल्याला भात बियाणी मिळतील या प्रतीक्षेत आहेत. मात्र ही खरेदी होणार नसल्याने या शेतकर्‍यांसमोर आता आपल्या शेतात काय पेरायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे आणि तो हवालदिल झाला आहे.