Wed, Apr 24, 2019 07:30होमपेज › Konkan › चिपळूण रेल्वे स्थानकात सुपरफास्ट गाड्या थांबाव्यात

चिपळूण रेल्वे स्थानकात सुपरफास्ट गाड्या थांबाव्यात

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 8:51PMचिपळूण : खास प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती असणार्‍या चिपळूण रेल्वे स्थानकात चार सुपरफास्ट रेल्वे गाड्या थांबाव्यात या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते व कोकण रेल्वे आंदोलन समिती सदस्य परवेज मेमन यांनी खा. विनायक राऊत यांना निवेदन दिले आहे. चिपळुणात चार एक्स्प्रेस गाड्या का थांबत नाहीत, असा सवाल त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयासमोर उपस्थित केला आहे.

चिपळूण रेल्वे स्थानकात हापा एक्स्प्रेस, ओखा-एर्नाकुलम एक्स्प्रेस, पोरबंदर-कोचुवेली एक्स्प्रेस, एर्नाकुलम-अजमेर मरुसागर एक्स्प्रेस या गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकात थांबत नाहीत. याबद्दल परवेज मेमन यांनी सवाल उपस्थित केले आहेत. चिपळूण-पनवेलमधील अंतर जास्त आहे. मात्र, या गाड्या थेट रत्नागिरीला थांबतात. अंतराच्या निकषाने चिपळूण रेल्वे स्थानकात या गाड्यांना थांबा का मिळत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

पर्यटनाच्या दृष्टीने केरळ ते राजस्थान, तामिळनाडू ते गुजरात येथील पर्यटक या गाड्यांमधून कोकणात येऊ शकतात. येथील भगवान परशुराम देवस्थान, गुहागर व दापोली आदी ठिकाणे पाहू शकतात. चिपळुणात या गाड्यांना थांबा मिळाल्यावर रेल्वेचे उत्पन्न वाढणार नाही का? सर्वसामान्यांच्या सेवेसाठी रेल्वे असताना मध्यवर्ती असणारे चिपळूण स्थानक वगळून चार एक्स्प्रेस गाड्या थेट रत्नागिरीत थांबतात, या परिसरात लोटे, खडपोली, गाणे या औद्योगिक वसाहती आहेत. कोयना वीज प्रकल्प, आरजीपीपीएल, डेरवण येथील मेडिकल कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालयात देशभरातून अनेक लोक येथे येत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी या चार एक्स्प्रेस गाड्या चिपळुणात थांबणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणण्यात आले आहे.