Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Konkan › कोकण रेल्वे रुळांवर दगड कोसळला

कोकण रेल्वे रुळांवर दगड कोसळला

Published On: Aug 26 2018 10:42PM | Last Updated: Aug 26 2018 10:42PMखेड : प्रतिनिधी

कोकण रेल्वेमार्गावर शनिवारी रात्री खेड तालुक्यातील सुकीवली चव्हाणवाडीनजीक रुळांवर दरडीतील दगड कोसळला. ही घटना ट्रॅकमनच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तत्काळ नियंत्रण कक्षात याबाबत कळविले. त्यानंतर दादरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी पॅसेंजर ट्रेन तत्काळ थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. सुकीवलीतील ग्रामस्थ व खेड येथील मदत ग्रुपच्या सदस्यांनी ट्रॅकवर कोसळलेला भला मोठा दगड बाजूला करून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाला सहकार्य केले.

कोकण रेल्वे मार्गावर सुकीवली चव्हाणवाडी नजीक डोंगर फोडून रेल्वे रूळ बसविले आहेत. पावसाळ्यात सुकीवली चव्हाणवाडी नजीकच्या या भागात रेल्वे रूळाच्या बाजूला असलेल्या दगडातून पाणी पाझरत असते. त्यामुळे दगड मोकळे होऊन रेल्वे रूळावर ढासळण्याच्या घडना वारंवार घडतात. शनिवारी रात्री रेल्वे रूळावरून गस्त घालणार्‍या ट्रॅकमनला भलामोठा दगड रूळावर येऊन पडल्याचे  निदर्शनास आले. दादर येथून सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सुटणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी रत्नागिरीच्या दिशेला मार्गस्थ होण्याची हीच वेळ असल्याने ट्रॅकमनने तत्काळ ही बाब कोकण रेल्वे नियंत्रण कक्षाला कळविली. नियंत्रण कक्षातून खेडनजीक पोहोचलेल्या दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या चालकाला याबाबत सूचित केले. त्यामुळे दगड कोसळलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर ही गाडी थांबविण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर थांबविल्यानंतर सुकीवली येथील ग्रामस्थ दादू कदम, रूपेश कदम, राकेश शिंदे, बळीराम निकम, खेड येथील मदत ग्रुपचे कार्यकर्ते प्रसाद गांधी, अक्षय भोसले, सुरज भोसले, रूपेश सावंत, निलेश शिंदे आदींसह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे कर्मचार्‍यांसोबत रूळावर आलेला दगड बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एक ते दिड तासांच्या कालावधीत दगड फोडून त्याचे तुकडे करून रूळावरून बाजूला केले. त्यानंतर दादर-रत्नागिरी पॅसेंजर रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.  या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या एक ते दिड तास उशीराने  धावत होत्या.