Wed, Jul 17, 2019 00:43होमपेज › Konkan › पॉलिशच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लंपास

पॉलिशच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लंपास

Published On: May 03 2018 11:23PM | Last Updated: May 03 2018 10:58PMवैभववाडी : प्रतिनिधी 

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी सोन्याचे 78 हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना गुरुवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास नाधवडे येथे घडली. याबाबत शोभा शिवाजी जाधव (वय 36, रा. नाधवडे) यांनी वैभववाडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार वैभववाडी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाधवडे येथील कांबळे हॉटेलनजीक शोभा जाधव आपल्या कुटुंबांसमवेत कामानिमित्त भाड्याने राहतात. गुरुवारी सकाळी दोन अनोळखी इसम मोटारसायकलने त्यांच्या घरी आले. आम्ही लादी पॉलिश करतो, असे सांगून दागिनेही पॉलिश करतो, असे सांगितले. यावेळी शोभा जाधव यांनी माझे पती घरी नाहीत.10 मे रोजी येणार आहेत, असे सांगितले.यावेळी अनोळखी इसमांनी लादी धुण्याची त्यांना पावडर दाखविली.तसेच दागिनेही आम्ही पॉलिश करतो असे त्या महिलेला सांगितले.यावेळी घरात त्यांच्या बहिणीची मुले आणि सासू टिव्ही बघत होते.यावेळी या महिलेने उजव्या पायातील साखळी पॉलिश करुन दिली. साखळी चकाचक करुन दिल्याने तिने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र,चेन व कानातील झुबके हे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी त्यांच्याकडे दिले. दागिने पॉलीश करण्याचा बहाणा करीत या महिलेची नजर चुकवून त्यांनी त्या महिलेला एक डबी दिली. या डबीमध्ये दागिने आहेत. दहा मिनिटांनी डबी उघडा, असे त्यांनी सांगितले. महिलेने दहा मिनिटांत डबी उघडून बघितली असता तिला धक्काच बसला.  डब्यात दागिने नव्हते.  तिने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे तरेळेच्या दिशेने पळून गेले.अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री.वरवडेकर करीत आहेत.

अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतानाही अजूनही लोकांमध्ये याबाबत म्हणावी तशी जगृती झाली नाही. याबाबत पोलिसांकडून जाणीव जागृती केली जाते.  तरीही लोकांच्या भोळसटपणाचा लाभ उठवतात, असे भामटे हातोहात लोकांची फसवणूक करतात.