Tue, Jul 16, 2019 02:00



होमपेज › Konkan › कुडाळ येथे राज्यस्तरीय पशुपक्षी मेळावा

कुडाळ येथे राज्यस्तरीय पशुपक्षी मेळावा

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:50PM

बुकमार्क करा





ओरोस : प्रतिनिधी

शेतकरी, बागायतदार, दुग्ध व्यावसायिक,पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी सिंधुदुर्ग जि. प. च्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत कुडाळ येथे राज्यस्तरीय कृषी पशुपक्षी व पर्यटन मेळाव्याचे आयोजन केले आहे. अशी माहिती जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी संयुक्‍त पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात गेली तीन वर्षे राज्यस्तरीय कृषी पशुपक्षी मेळावा प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षी मेळाव्याचे चौथे वर्ष असून या मेळाव्याचे उद्घाटन  े माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 23 रोजी होणार आहे.

  मेळाव्यात कृषी व पशुसंवर्धन विभागाशी निगडित सुमारे 200 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये आधुनिक व पारंपारिक औजारे यंत्रसामुग्री, सेंद्रीय खते, बि-बियाणे, सिंचन साधने, पशुखाद्य व औषधे, डेअरी, पोल्ट्री, मत्स्य विभागाशी निगडित साहित्य, पुस्तके, स्टॉल सहभागी होणार आहेत. याबरोबर संकरित व देशी गायी, म्हैस, शेळी, मेंढी, ससे, शोभिवंत मासे प्रदर्शनासाठी व विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  या मेळाव्यामध्ये विविध तज्ज्ञांची मार्गदर्शन शिबिरे व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन व दुग्ध व्यवसाय व कृषी पर्यटन तसेच कृषी पर्यटनावर विशेष मुक्‍त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  मेळाव्याचे औचित्य साधून बैलगाडी सजावट स्पर्धा, सुदृढ गाय- वासरू, बैल, म्हैस स्पर्धा, आंतरराज्य डॉग शो, पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदर्श शेतकरी, बागायतदार, पशुपालक व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्‍तींचे सत्कार यानिमित्ताने करण्यात येणार आहेत. पाच दिवस चालणार्‍या या मेळाव्यामध्ये स्थानिक कलाकार विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असून यामध्ये तिरंगी भजनाचा सामना, संयुक्‍त दशावतार, फुगडी लोककलांचे कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक व अन्य बँक सहभागी होणार असून जिल्हा बँकेमार्फत विविध औजारे व जनावरे खरेदीकरिता तात्काळ कर्जमंजुरी देण्यात येणार आहे. तांदूळ महोत्सव, सिंधुमेवा या स्थानिक उत्पादनाचे दालन या महोत्सवाचे वैशिष्ट्य असून लहान मुलांसाठी करमणुकीचे दालन, खवय्यांसाठी स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल, महाबळेश्‍वरसह अन्य ठिकाणची खेळणी मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी, पशुपालक व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जि. प. अध्यक्ष रेश्मा सांवत, उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी केले आहे.यावेळी कृषी, पशुसंवर्धनचे अधिकारी उपस्थित होते.