Mon, Mar 25, 2019 04:58
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › मुचरीत गोवा मद्य वाहतुकीचा ओघ

मुचरीत गोवा मद्य वाहतुकीचा ओघ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

गेल्या तीन-साडेतीन वर्षांत कोट्यवधी रुपये किमतीचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने पकडले. मद्याची वाहतूक करणारी अनेक वाहने जप्त करून अनेकांना अटकही केली. परंतु, जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील मुचरी घोटळवाडीकडे गोवा बनावटीचे मद्य बेकायदेशीररित्या घेऊन जाणार्‍या वेगवेगळ्या वाहनांकडे या विभागाचा कानाडोळा झाला आहे. ग्रामस्थांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार करून लक्ष वेधले आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गेल्या तीन-साडेतीन वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावर जोरदार कारवाई केल्याने मद्य माफियांचे कंबरडे मोडले. यातून प्रामुख्याने गोव्याकडून मुंबईकडे होणारी गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक मंदावली. चिपळूण, राजापूर तालुक्यांत स्थानिक पातळीवरही छापे मारण्यात आले. अगदी कुरियर व्हॅनमधून वाहतूक होणारे मद्याचे बॉक्स पकडण्यात आले. परंतु, गेल्या काही वर्षांपासून मुचरी घोटळवाडीकडे जाणार्‍या गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीकडे अजून लक्ष न गेल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. एका भक्‍कम क्षमतेच्या एक्साईज विभागाची मुचरीतील वाहतुकीकडे डोळेझाक का? असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे.

काही वर्षांपूर्वी मुचरीतील गोवा मद्याचा व्यवसाय छोट्या प्रमाणात होता. आता तो धंदा फोफावला आहे. मोठमोठ्या वाहनांतून गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स येत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. तशा तक्रारीही संबंधित अधिकार्‍यांकडे येऊ लागल्या आहेत. आजूबाजूच्या बुरंबी, तेरे, कुळ्येवाडी, सोनवडे, बोरसूत, विघ्रवली, सायले आदी गावांमध्येही या मद्याची विक्री होत आहे. तरीही ज्यांच्याकडे कारवाईचे अधिकार आहेत त्या उत्पादन शुल्क विभागाला थांगपत्ता लागलेला नाही. याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

गोव्यात मद्य निर्मितीवर, निर्मितीसाठी लागणार्‍या विविध वस्तूंवर नाममात्र कर आहे. मद्य विक्री करणार्‍या दुकानांची परवाना नुतनीकरण फीसुद्धा नाममात्र आहे. त्यामुळे उत्पादनासाठी खर्च कमी होत असल्याने तेथे मद्य स्वस्तात मिळते. गोव्यात 200 रुपयांना मिळणारी विदेशी मद्याची पूर्ण बाटली महाराष्ट्रात 800 रुपयांमध्ये विकली जाते. अशा या फायदेशीर धंद्यासाठी गोव्यातील मद्याची चोरटी वाहतूक करून भरमसाठ नफा कमावणारे मद्य माफिया कार्यरत आहेत. 

शिमगोत्सव संपता संपता मुचरीतील या व्यावसायिकाने खाकी रखवालदारांना पार्टी दिली. सुमारे 30 ते 35 रखवालदारांनी या पार्टीला उपस्थिती लावून शिमगोत्सवाची सांगता केली. मात्र, पार्टीतील रखवालदार कोणत्या विभागाचे होते? याचा शोध ग्रामस्थांकडून घेतला जात आहे. ही माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आणि संबंधित प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी ग्रामस्थांकडून शोधकाम केले जात आहे. गोवा मद्य विक्री करणार्‍या व्यावसायिकांची गावात दहशत आहे. 

Tags :


  •