Thu, Dec 12, 2019 08:12होमपेज › Konkan › परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरू

परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरू

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 18 2019 12:10AM
चिपळूण : खास प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला दरडींचे ग्रहण लागले आहे. सातत्याने या घाटात दरडी कोसळत असून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता दरड महामार्गावर कोसळली आणि हा महामार्ग सुमारे चार तास ठप्प झाला होता. यानंतर शर्थीचे प्रयत्न करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, बुधवारी (दि. 17) पुन्हा काम सुरू असताना सातत्याने माती खाली येत असल्याने कामात व्यत्यय येत होता. यामुळे सद्यःस्थितीत घाटातून एकेरी वाहतूक सुरू असून याचा फटका शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी व लोटे एमआयडीसीला बसला आहे.

मंगळवारच्या घटनेला आता 32 तास उलटले, तरी दरड काढण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे. गेले चार दिवस होणार्‍या अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक अनेकदा खंडीत झाली आहे. परशुराम घाटात सलग सहा वेळा दरड कोसळली आहे. मात्र, मंगळवारी कोसळलेली दरड महाकाय असल्याने एक जेसीबी, पोकलेन व डंपरच्या माध्यमातून दरड काढण्याचे काम सुरुच आहे. मंगळवारी रात्री 8 वा. एकेरी वाहतूक सुरू झाली व त्यानंतर दरड काढण्याचे काम थांबविण्यात आले. अनेकवेळा दरड काढत असतानाच दरड कोसळत असल्याने जीव धोक्यात घालून काम सुरू होते. रात्रीच्या अंधारामुळे हे काम थांबवून पुन्हा बुधवारी सकाळी काम सुरू करण्यात आले. दरम्यान बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घाटात पुन्हा माती खाली आली. 

मोठ्या प्रमाणात दगड व मातीचे ढीग रस्त्यावर आल्याने ते डंपरमधून अन्यत्र टाकण्यात येत होते. हे काम सुरू असतानाच महामार्गावरुन एकेरी वाहतूक देखील सुरू होती. त्यामुळे कामाला गती मिळत नव्हती. शिवाय महामार्ग बंद ठेवणेदेखील शक्य नव्हते.  त्यामुळे पोलिस बंदोबस्तात पंधरा मिनिटांच्या अंतराने दोन्ही बाजूकडील वाहनांना एकेरी मार्गाने सोडण्यात येत आहे.

चिपळूणकडून जाणारी वाहतूक सोडल्यानंतर 15 मिनिटांनी खेडकडून येणारी वाहतूक चिपळूणकडे सोडण्यात येत आहे. या दरम्यान दरड काढण्याचे काम देखील सुरू आहे. त्यात पुन्हा दरड कोसळत असल्याने महामार्गावरील वाहतुकीत व्यत्य येत आहे. परिणामी परशुराम घाटात वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. तसेच प्रवाशांचा खोळंबा होत आहे. यामध्ये वाहतूक कोंडी होऊन सुमारे एक ते दीड तासाचा वेळ परशुराम घाटात वाया जात आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीमधील बहुतांश कामगार व अधिकारी चिपळुणात राहतात. तीन शिफ्टमध्ये चालणारी ही औद्योगिक वसाहत असल्याने त्यांची ने-आण करण्यासाठी चिपळूण येथूनच बससेवेची व्यवस्था आहे. मात्र, घाटात होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे एमआयडीसीच्या वेळेचे नियोजन कोलमडले आहे. तसेच परशुराम येथे एसपीएम इंग्लिश स्कूल आहे. या शाळेला बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर एसपीएमचे विद्यार्थी रात्री 8 वाजेपर्यंत घाटात अडकून होते. त्याच पद्धतीने एमआयडीसीतील कर्मचारी व अधिकार्‍यांचाही खोळंबा झाला होता. त्यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अजूनही दरड काढण्याचे काम सुरू असल्याने एकेरीच वाहतूक सुरू आहे.

पर्यायी मार्ग

परशुराम घाटामध्ये दरड कोसळत असल्याने या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून खेडमधील खोपी फाट्यातून गुणदे मार्गे शेल्डी, चिरणी व त्यानंतर कळंबस्ते मार्गे वाहने चिपळुणात येऊ शकतात. अवजड वाहने वगळून छोटी व एसटीसाठी हा मार्ग सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे शक्य होणार आहे. दुसरा छोट्या गाड्यांसाठी पर्याय म्हणून पीरलोटेमधून डाव्या बाजूला चिरणीकडे जाणार्‍या रस्त्याकडे कळंबस्ते मार्गे चिपळुणात येत असतात. मात्र, हा मार्ग अरुंद असल्याने केवळ छोट्या गाड्यांसाठीच सोयीचा ठरेल.