Tue, Jul 23, 2019 02:00होमपेज › Konkan › दारुची बंद दुकाने सुरू अन् चालू शाळा बंद!

दारुची बंद दुकाने सुरू अन् चालू शाळा बंद!

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:11PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

राज्यात काही देशी, विदेशी दारू दुकाने नियमात बदल करून पुन्हा चालू झाली आहेत. मात्र तेच शासन दुसरीकडे पटसंख्येच्या कारणास्तव चालू शाळा बंद करण्याच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे ‘बंद दारू दुकाने सुरू आणि सुरू शाळा बंद’ याबाबतचा संताप सध्या सोशल मीडियावर व्यक्‍त केला जात आहे.

ज्या ठिकाणी कमी पटसंख्या असेल अशा शाळा बंद करण्याचे नवीन धोरण बाहेर येऊ लागले आहे. दुसरीकडे खासगी कार्पोरेट शाळांसाठी हालचाल सुरू झाली आहे. यामुळे ग्रामीण, भौगोलिकद‍ृष्ट्या मागासलेल्या व अशिक्षित जनतेवर याचा गंभीर परिणाम होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

कार्पोरेट कंपन्यांना कोठेही, कोणत्याही माध्यमाच्या शाळा सुरू करण्यास परवानगी देणारे विधेयक विधानसभेत मंजूर झालेे. शासनाच्या या धोरणावर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिक्षणातील कंपनीराज गोरगरीब, वंचितांच्या मुळावर येणार असल्याची भीती व्यक्‍त होत आहे. गोरगरीब, बहुजन, वंचितांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

काही ठिकाणी निश्‍चितच कमी पटसंख्या आहे. त्यामुळे तेथे शासनाकडून खर्चाचा विचार होणे गरजेचे आहे. मात्र, त्याचवेळी ती शाळा बंद झाल्यावर दुसर्‍या गावच्या शाळेत समायोजन झाल्यावर त्या दोन्ही गावांतील अंतर, रस्त्यांची गैरसोय, पावसाळा, अतिवृष्टीच्या काळात नदी, ओढ्यांमधूनचा प्रवास त्याचबरोबर अलीकडच्या काळात ग्रामीण विभागात वन्य प्राण्यांचे होणारे हल्ले यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही तितकाच गंभीर आहे.

यापूर्वीच्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व नव्हते. आता शिक्षणाचे महत्त्व पटले असतानाच शासनाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मुले पुन्हा निरक्षर राहण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यामुळे भलेही शासनाला हा खर्च जास्त वाटत असेल तरी कोणीही निरक्षर राहू नये यासाठी शासनाने याचा पुनर्विचार करावा, असे सामाजिक मत आहे. बंद केलेली दारू दुकाने पूर्ववत चालूही झाली. वास्तविक जर शासनाला खरोखरच दारू बंदच करायची असती तर त्यांनी दुकानांऐवजी दारू निर्मितीच बंद केली असती, असे आता बोलले जात आहे.